स्टार फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्यामुळे सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताला २-० ने पराभव स्वीकारावा लागला. यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने यासाठी कुठली सबब देणार नसल्याचे सांगितले. कोहलीने कबुल केले की, ‘दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी भारतीय संघाला संधी उपलब्ध करुन दिली होती, पण फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.’
कोहली म्हणाला, ‘विदेशात जिंकण्यासाठी सरस कामगिरी आवश्यक आहे. कसोटी सामन्यांत आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजांनी गोलंदाजांना आक्रमण करण्यासाठी पुरेशा धावा केल्या नाहीत. गोलंदाजी चांगली झाली. माझ्या मते वेलिंग्टनमध्येही आम्ही चांगली गोलंदाजी केली.’
कोहली पुढे म्हणाला,‘सलामी लढतीत आम्हाला आक्रमकता दाखविता आली नाही. तसेच अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी करता आली नाही. आम्हाला रणनीतीनुसार खेळ करता आले नाही. यापुढे योग्य रणनीतीचा वापर करावा लागेल.’ नाणेफेकीबाबत कोहली म्हणाला, ‘हा एक मुद्दा असू शकतो, पण आम्ही तक्रार करणार नाही. यामुळे प्रत्येक कसोटी लढतीमध्ये गोलंदाजांना अतिरिक्त फायदा मिळाला.’
>‘केवळ रिषभ पंतला दोषी ठरविता येणार नाही’
‘टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या रिषभ पंतला बºयाच संधी मिळाल्या, पण सध्यातरी संघात या युवा यष्टिरक्षकाच्या स्थानी दुसºयाला संधी देण्याबाबत विचार केलेला नाही कारण सामूहिक अपयशामध्ये केवळ एका खेळाडूला दोषी ठरविता येणार नाही,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने सांगितले. कामगिरीत सातत्य नसल्यामुळे पंत गेल्या वर्षभरापासून टीकाकारांचे लक्ष्य ठरला आहे. पंतची पाठराखण करताना कोहली म्हणाला,‘आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीला आम्ही मायदेशात त्याला बºयाच संधी दिल्या. त्यानंतर तो काही काळ संघाबाहेर होता. त्यानंतर त्याने कसून मेहनत घेतली. अन्य कुणाला संधी देण्याची योग्य वेळ कुठली, हे तुम्हाला निश्चित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही वारंवार बदल केला, तर खेळाडूचा आत्मविश्वास ढासळू शकतो. हे आमचे सामुहिक अपयश आहे. त्यामुळे केवळ त्याला एकट्याला दोषी ठरविणे चुकीचे आहे.’
>संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ६३ षटकांत सर्वबाद २४२ धावा.
न्यूझीलंड (पहिला डाव) : ७३.१ षटकांत सर्वबाद २३५ धावा.
भारत (दुसरा डाव) : ४६ षटकांत सर्वबाद १२४ धावा (चेतेश्वर पुजारा २४, रवींद्र जडेजा नाबाद १६, पृथ्वी शॉ १४, विराट कोहली १४; टेÑंट बोल्ट ४/२८, टिम साऊदी ३/३६.)
न्यूझीलंड (दुसरा डाव) : ३६ षटकांत ३ बाद १३२ धावा (टॉम ब्लंडेल ५५, टॉम लॅथम ५२; जसप्रीत बुमराह २/३९, उमेश यादव १/४५.)