क्रिकेट सामना सुरू असतानाच एका फलंदाजाचा भर मैदानातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील फिरोजपूर येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यामध्ये मृत्यू झालेला तरुण फलंदाजी करताना दिसत आहे. एका चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर तो अस्वस्थ वाटू लागल्याने मैदानातच बसला. सहकारी खेळाडूंना आणि उपस्थित प्रेक्षकांना काही समजण्यापूर्वीच तो खाली कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
सुरुवातीला नेमकं काय घडलं हे तिथे उपस्थित असलेल्या खेळाडूंना आणि पंचांना समजलं नाही. मात्र नंतर सर्वांनी या फलंदाजांच्या दिशेने धाव घेतली. तसेच त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेरीस त्याचा तिथेच मृत्यू झाला.
मृत तरुणाचं नाव हरजित असं असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो एक उत्तुंग षटकार ठोकताना दिसत आहे. मात्र षटकार ठोकल्यानंतर लगेचच तो जमिनीवर बसला. त्यानंतर छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने तो जमिनीवर झोपल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान, सहकारी खेळाडू सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याला वाचवण्यात यश मिळू शकलं नाही.