ख्राईस्टचर्च : येथे एका मशिदीवर झालेल्या गोळीबारानंतर बांगलादेश संघाचा न्यूझीलंड दौरा शुक्रवारी रद्द करण्यात आला. या घटनेतून बांगलादेशचे क्रिकेटपटू थोडक्यात बचावले आहेत. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी बांगलादेशचे क्रिकेटपटू त्याच मशिदीमध्ये नमाज पठणासाठी जात होते.
न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिडा अर्डन यांनी या घटनेचा ‘हिंसेचा घृणास्पद प्रकार’ या शब्दात निषेध नोंदविला. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हॅगले पार्कमध्ये असलेल्या अल नूर या मशिदीत बांगलादेश क्रिकेट संघ नमाजसाठी जाणार होता. तथापि, ते बचावले असून सुरक्षित आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी आज, शनिवारपासून सुरू होणारा तिसरा व अखेरचा कसोटी सामना रद्द केला. बांगलादेशचा दौऱ्यातील हा अखेरचा सामना होता. मशिदीशेजारी बांगलादेश संघाचे वास्तव्य होते. घटनेनंतर संघाला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलविण्यात आले. याशिवाय बांगलादेशकडे रवाना होण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेळाडू सुरक्षित असले तरी घाबरलेले आहेत. डोळ्यादेखत घडलेली घटना ते विसरू शकत नाहीत, असे बांगलादेश संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करणारे चेन्नईचे श्रीनिवास चंद्रशेखरन यांनी सांगितले.
नमाज आटोपून खेळाडू सराव करणार होते
ख्राईस्टचर्च येथील ज्या नूर मशिदीत गोळीबार झाला, तेथे बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू शुक्रवारचा नमाज पढणार होते. नमाजनंतर तिसºया कसोटीची तयारी म्हणून सराव करण्याचे ठरले होते, अशी माहिती बांगलादेश संघाचे विश्लेषक असलेले चेन्नई येथील श्रीनिवास चंद्रशेखरन यांनी दिली.