ढाका : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी पैसे जमवण्याकरिता पुढे आला आहे. यासाठी तो २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वापरलेल्या आपल्या बॅटचा लिलाव करणार आहे.
सट्टेबाजांनी संपर्क साधल्याची माहिती न दिल्यामुळे शाकिब सध्या दोन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरा जात आहे. शाकिबआधी बांगलादेशचा अनुभवी यष्टीरक्षक मुशफिकुर रहीमनेही आपल्या वैयक्तिक क्रिकेट सामानाचा लिलाव केला होता. फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना शाकिबने म्हटले की,‘मी याआधीही माझ्या बॅटचा लिलाव करणार असल्याचे सांगितले होते. विश्वचषक २०१९ स्पर्धेत वापरलेल्या बॅटचा लिलाव करण्याचे मी ठरविले आहे. ही माझी खूप आवडती बॅट आहे.’ इंग्लंडमध्ये झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत शाकिब जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने ८ सामने खेळताना ६०६ धावा काढल्या, तसेच ११ बळीही मिळवले होते.