बांगलादेशचा स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार तमीम इक्बाल याची प्रकृती चिंताजनक आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना मैदानावरच छातीत दुखू लागल्याने तमीम इक्बाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब आणि शिनपुकूर क्रिकेट क्लब यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढीदरम्यान ही घटना घडली.
मोहम्मदन स्पोर्टिंग क्लबचा कर्णधार असलेला तमीम इक्बाल नाणेफेकीसाठी मैदानात आला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षणादरम्यान, त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचारांसाठी मैदानात धाव घेतली. तसेच त्या ढाका येथे नेण्यासाठी हेलिकॉप्टरलाही पाचारण करण्यात आले. मात्र तमीम याची प्रकृती खूपच चिंताजनक होती. तसेच तो हेलिकॉप्टरमध्ये तढण्याच्या स्थितीत नव्हता. अशा परिस्थितीत ढाका ऐवजी त्याला फाजिल तुन्नेस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत मोहम्मदन स्पोर्ट्स क्लबचे अधिकारी तारिकूल इस्लाम यांनी सांगितले की, तमीम इक्बाल सध्या रुग्णालयात दाखल असून, त्याची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. त्यामुळे त्याला सध्यातरी विमानातून ढाका येथे नेता येणार नाही.