Join us  

सहकाऱ्याला मारणं पडलं महागात; बांगलादेशच्या खेळाडूवर पाच वर्षांची बंदी, अन्...

दुसऱ्या कसोटीपूर्वी बांगलादेशच्या गोलंदावर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:20 PM

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही संघांसाठी डे नाइट कसोटीचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू कसून सरावही करत आहेत. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात एक डाव व 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका पराभव टाळण्यासाठी बांगलादेशला कोलकातात विजय मिळवावा लागेल. या कसोटीपूर्वी बांगलादेशच्या गोलंदावर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई झाली आहे. शिवाय त्याला जवळपास 2.5 लाख दंड म्हणून भरावे लागणार आहेत.

क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंमध्ये होणारे वाद ही काही नवीन बाब नाही, परंतु आपल्याच सहकाऱ्यारा चोप देण्याचा प्रकार कदाचित प्रथमच घडला असावा. बांगलादेशच्या क्रिकेटपटू शहादत होसैन यानं आपल्याच सहकाऱ्याला शुल्लक कारणास्तव मारहाण केली आणि आता त्याच्यावर एका वर्षांच्या बंदीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. सहकाऱ्यानं चेंडू नीट साफ केला नाही, म्हणून शहादतनं ही मारहाण केली आणि हा प्रकार नॅशनल क्रिकेट लीग दरम्यान घडला.

नॅशनल लीगमध्ये ढाका विभाग आणि खुलना विभाग यांच्यात सामना सुरू होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शहादतनं नाराजी प्रकट करताना सहकारी अराफट सन्नीला मारहाण सुरू केली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. या घटनेनंतर शहादतनं त्याची बाजूही मांडली होती. तो म्हणाला,''माझे रागावरील नियंत्रण सुटले हे खरे आहे, परंतु त्यानेही माझ्यासोबत गैरवर्तणूक केली. त्यानं चेंडू साफ करण्यास मनाई केली आणि याचा जाब जेव्हा विचारला, तेव्हा त्याचा उद्धटपणा मला आवडला नाही.''

आता शहादतला पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यात दोन वर्षांच्या निलंबनाचा समावेश आहे. शिवाय त्याला 3 लाख टका ( भारतीय रकमेत 2.5 लाख रुपये) दंड भरावा लागणार आहे. होसैननं बांगलादेशकडून 38 कसोटी सामन्यांत 72 विकेट्स घेतल्या आहेत. 51 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर 47 विकेट्स आहेत.

टॅग्स :बांगलादेशआयसीसी