अबूधाबी - परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानला त्यातून सावरत बुधवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
सुपर फोरच्या या लढतीत विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळेल. भारताविरुद्धच्या पराभवामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेला पाकिस्तान संघ आता आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अधिक धावा करता आल्या नव्हत्या. त्यानंतरच्या लढतीत त्यांच्या फलंदाजीत सुधारणा दिसली, पण आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. पाकला अंतिम फेरीसाठी बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करावी लागेल. त्यांच्या फलंदाजांनी अनुभवी शोएब मलिककडून शिकायला हवे. त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरचा खराब फॉर्म पाकसाठी मोठी चिंतेची बाब आहे. कर्णधार सरफराज अहमदने भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी आमिरने बळी घेणे संघासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतरही या गोलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
वाटचाल खडतर
भारताविरुद्ध सुपर फोर सामन्यात ९ गड्यांनी लाजिरवाणारा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी संघाची वाटचाल खडतर असल्याचे म्हटले आहे. ‘निर्णायक लढतींत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरते,’ असे प्रशिक्षक आर्थर यांनी यावेळी म्हटले.