भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळेल अशी अटकळ होती. परंतु, विराटने हे स्पष्ट केले की, तो फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. याच पार्श्वभूमीवर, बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याने महत्त्वपूर्ण विधान केले. त्याने काही महिन्यांपूर्वीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी, आता तो पुन्हा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त करत आहे.
शाकिब अल हसन गेल्या एका वर्षापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने 'बियर्ड बिफोर विकेट पॉडकास्ट'वर बोलताना हा मोठा खुलासा केला. "मी अधिकृतपणे सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेली नाही. मी पहिल्यांदाच हे उघड करत आहे. माझी योजना बांगलादेशला परत जाऊन एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० ची संपूर्ण मालिका खेळण्याची आणि त्यानंतर निवृत्ती घेण्याची आहे." शाकिबने स्पष्ट केले की, त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायला कोणतीही अडचण नाही आणि त्याला फक्त संपूर्ण मालिका खेळायची आहे.
शाकिब अल हसन हा २०२४ पासून बांगलादेश संघाचा भाग नाही. कानपूरमध्ये भारताविरुद्ध खेळलेला शेवटचा कसोटी सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरला. ऑक्टोबरमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, त्याला कसोटीत संधी नाकारण्यात आली.
शाकिब अल हसनची कारकिर्द
शाकिब हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि त्याने अनेक सामन्यांमध्ये बांगलादेश संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने कसोटीत ४ हजार ६०९ धावा केल्या आहेत आणि २४६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात ७ हजार ५७० धावा आणि ३१७ विकेट्स आहेत. टी२० क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. टी-२० मध्ये त्याने १२९ सामन्यांमध्ये २ हजार ५५१ धावा आणि १४९ विकेट्स घेतल्या आहेत.