नवी दिल्ली- बांगलादेश क्रिकेट बोर्डा(बीसीबी)ला संघाच्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागला आहे. बांगलादेश क्रिकेट चाहत्यांच्या नाराजीनंतर बीसीबीला हे पाऊल उचलावं लागलं आहे. बांगलादेश क्रिकेट संघाच्या जर्सीला क्रिकेट चाहत्यांनी विरोधक केल्यानंतर पूर्णतः हिरव्या रंगामध्ये असलेल्या जर्सीत लाल रंग मिसळला आहे. espncricinfoच्या माहितीनुसार, बीसीबीनं हा जर्सीतील बदल करण्यासाठी आयसीसीकडे परवानगी मागितली होती.
बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजातही हिरव्या रंगांमध्ये लाल रंगाचं वर्तुळ आहे. आयसीसी वर्ल्ड कपसाठी जारी करण्यात आलेल्या जर्सीच्या डिझाइनवरून सोशल मीडियावर बीसीबी ट्रोल झाले होते. अनेक युजर्सनी बीसीबीला अक्षरशः धारेवर धरलं होतं. रिपोर्टनुसार, बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन म्हणाले, जर्सीचं अनावरण केल्यानंतर मी बोर्ड डायरेक्टर्सबरोबर बसून पुन्हा एकदा जर्सीच्या डिझाइनचं निरीक्षण केलं. त्याच दरम्यान कोणी तरी लाल रंग जर्सीत नसल्याचं लक्षात आणून दिलं. त्यामुळे आम्ही जर्सीमध्ये लाल रंग टाकण्याचा निर्णय घेतला.
आयसीसीनं आमच्या जर्सीमध्ये लाल रंग न ठेवण्याचा सल्ला दिला होता. आमच्याकडे इतर सामन्यात खेळण्यासाठी एक वेगळी जर्सी आहे, ती पूर्णतः लाल रंगाची आहे. बांगलादेश क्रिकेट टीमच्या नव्या जर्सीत लाल रंगाचा पॅच आहे. ज्यात संघाचं नाव लाल रंगात लिहिण्यात आलं आहे. आमच्या जर्सीमध्ये अनेक वर्षांपासून हिरवा आणि लाल रंगांचा समावेश आहे. पण असाही एक काळ होता, जेव्हा आमच्या जर्सीत लाल रंग नव्हता. मला आठवतंय 1999च्या वर्ल्ड कप आणि 2000च्या आशिया कपदरम्यान आमची जर्सी पिवळी आणि हिरवी होती. त्यानंतर आम्ही या जर्सीचं डिझाइन आयसीसीला पाठवलं आणि त्यांनी सहमती दिलेली जर्सी खेळाडूंना दिली.