Bangladesh vs West Indies, 2nd ODI, WI Beat BAN In Super Over : बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेला सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना सर्वच्या सर्व फिरकीपटूंनी गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. मग या सामन्यात सामन्यात सुपर ओव्हरची भर पडली. बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या बदल्यात पाहुण्या कॅरेबियन संघासमोर २१४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला अखेरच्या षटकात ५ धावांची गरज होती. बांगलादेशच्या संघाकडून सैफ हसन याने एक विकेट घेत अखेरच्या षटकात फक्त ४ धावा खर्च करत वेस्ट इंडिजला २१३ धावांवर रोखले अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सुपर ओव्हरमध्ये होपनं कॅरेबियन संघाला दिला दिलासा, बांगलादेशला मिळाले ११ धावांचे टार्गेट
सुपर ओव्हरमधील नियमानुसार, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली. शई होप आणि शेर्फेन रदरफोर्ड ही जोडी सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीला आली. बांगलादेशकडून स्टार गोलंदाज मुस्तफिजुर सुपर ओव्हरचं षटक टाकले. शई होपनं पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केल्यावर दुसऱ्याच चेंडूवर मुस्तफिझुर याने स्फोटक बॅटर रदरफोर्ड याला चालते केले. त्याच्या जागी फलंदाजीला आलेल्या ब्रँडन किंग याने तिस्या चेंडूवर दुहेरी आणि चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत शई होपला स्ट्राइक दिले. होपनं वेस्ट इंडिजच्या आशा पल्लवित करताना पाचव्या चेंडूवर दुहेरी धाव घेतल्यावर अखेरच्या चेंडूवर चौकार मारत सुपर ओव्हरमध्ये संघाच्या धावफलकावर १० धावा लावत बांगलादेशच्या संघासमोर ११ धावांचं टार्गेट सेट केले.
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
सुपर ओव्हरमध्ये ३ फुकटच्या धावा! ३ अवांतर चेंडू मिळूनही बांगलादेशला उठवता आला नाही फायदा
सुपर ओव्हरमध्ये मिळालेल्या ११ धावांचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेशच्या संघाकडून सौम्या सरकार आणि सैफ हसन जोडी मैदानात उतरली. संपूर्ण सामन्यात फिरकीवर भरवसा ठेवणाऱ्या कॅरेबियन संघाने सुपर ओव्हरमध्येही चेंडू फिरकीपटू अकिल होसीन याच्याकडे सोपवला. त्याने पहिला चेंडू वाइड टाकत बांगलादेशला हातभार लावला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर दुसरा चेंडू नो बॉल टाकून २ धावा खर्च केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशच्या संघाचं टार्गेट ६ चेंडूत ७ धावांचे झाले. पहिला वैध चेंडू टाकताना अकिल होसीन याने एक धाव खर्च केल्यावर त्यानंतर एक चेंडू निर्धाव टाकला. पुन्हा तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या संघाला फक्त एक धाव मिळाली. ३ चेंडूत ५ धावांची गरज असताना चौथ्या चेंडूवर सौम्या सरकार झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर लेग बाइजच्या रुपात एक धाव मिळाल्यावर बांगलादेशच्या संघाला अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती. त्यात अकिल होसीन याने आणखी एक चेंडू वाइड टाकला. पण शेवटी एक धाव खर्च करत वेस्ट इंडिजच्या संघानं बाजी मारली अन् मालिकेत १-१ असा बरोबरीचा डाव साधला.