Bangladesh vs Pakistan, 2nd T20I : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना ढाका येथे सुरू आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करायला लागला होता. पण, या सामन्यात त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना यजमान बांगलादेशला बॅकफूटवर टाकले आहे. शाहिन आफ्रिदीनं पहिल्या षटकात, तर मोहम्मद वासीमनं दुसऱ्या षटकात बांगलादेशला धक्के दिले. २ बाद ५ अशी अवस्था बांगलादेशची झाली होती, परंतु नजमुल होसैन व आफिफ होसैन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. ही भागीदारी तोडण्यासाठी पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीकडून रडीचा डावही खेळला गेला.
आफिफनं तिसऱ्या षटकात आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार खेचला, त्यामुळे चिडलेल्या आफ्रिदीनं आफिफला चेंडू फेकून मारला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आफिफनं षटकार खेचला. चौथा चेंडू आफिफनं बचावात्मक खेळला अन् तो आफ्रिदीच्या हातात गेला. पाकिस्तानी गोलंदाजानं आफिफ क्रिजवर असूनही चेंडू जोरात फेकला अन् तो बांगलादेशच्या फलंदाजाच्या पायावर आदळला. त्यानंतर आफिफ वेदनेनं जमिनीवर झोपला. आफ्रिदीनं लगेच माफी मागितली, परंतु त्याची ही कृती लोकांना फार आवडली नाही. शादाब खाननं ९व्या षटकात आफिफला ( २०) बाद केले.
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला ७ बाद १२७ धावा करता आल्या होत्या. अफिफ होसैन ( ३६), महेदी हसन ( ३०) व नुरूल हसन ( २८) यांनी संघासाठी संघर्ष केला. पाकिस्तानचा हसन अलीनं २२ धावांत ३ व विकेट्स घेतल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा निम्मा संघ ८० धावांवर माघारी परतला होता. खुशदील शाह व शादाब खान यांनी संघर्ष केला. पण, शोरीफुल इस्लामनं ही भागीदारी तोडताना खुशदीलला ३४ धावांवर बाद केले. १२ चेंडूंत १७ धावांची गरज असताना मोहम्मद नवाजनं दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. अखेरच्या षटकात शादाबनं षटकार खेचून पाकिस्तानचा विजय पक्का केला. पाकिस्ताननं हा सामना ४ विकेट्स व ४ चेंडू राखून जिंकला. शादाब २१ व नवाज १८ धावांवर नाबाद राहिला.