Join us  

आग अन् किटाळ!; ट्वेंटी-२०त संघाने कुटल्या 'विराट' ३१८ धावा; ५० चौकार अन् फलंदाजाची नाबाद १६१ धावांची विक्रमी खेळी!

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कधी कोणता विक्रम मोडला जाईल याचा नेम नाही... या फॉरमॅटमध्ये  ख्रिस गेल हा युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 4:09 PM

Open in App

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये कधी कोणता विक्रम मोडला जाईल याचा नेम नाही... या फॉरमॅटमध्ये  ख्रिस गेल हा युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जातो. ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा, सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, सर्वाधिक षटकार- चौकार इतकंच काय तर सर्वाधिक शतकंही त्याच्याच नावावर आहेत. पण, आज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अशा एका विक्रमाची नोंद झालीय की तो तोडणे आता कोणाला जमेल की नाही, यात शंका आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या नावावर एका डावात सर्वाधिक ३ बाद २७८ धावांचा विक्रम आहे. आयर्लंडविरुद्ध त्यांनी २०१९ मध्ये ही विक्रमी कामगिरी केली होती. पण, आज महिला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

महिला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यूगांडा संघाने २ बाद ३१४ धावांची विश्वविक्रमी कामगिरी केली होती, परंतु आज बहरिनच्या महिलांनी हा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला. Women's Twenty20 Championship Cup स्पर्धेत बहरिनच्या महिला संघाने सौदी अरेबियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यांनी २० षटकांत १ बाद ३१८ धावांचा एव्हरेस्ट उभा केला. विशेष म्हणजे बहरिनच्या फलंदाजांनी एकही षटकार खेचला नाही. त्यांनी एकूण ५० चौकार मारताना आधिचा ३४ चौकारांचा विक्रम मोडला. कर्णधार थरंगा गजनायके ( Tharanga Gajanayake ) आणि दीपिका रसंगिका  ( Deepika Rasangika ) यांनी वादळी खेळी केली. सलामीवीर रसिका रॉड्रीगो १३ धावांवर बाद झाल्यानंतर थरंगा व दीपिका यांनी जवळपास २५०+ धावांची भागीदारी केली.

थरंगाने ५६ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने ९४ धावा केल्या, तर दीपिकाने ६६ चेंडूंत ३१ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १६१ धावा केल्या. दीपिकाने एका खेळीत सर्वाधिक २० चौकारांचा विक्रम मोडला. प्रत्युत्तरात सौदी अरेबियाच्या  संघाला २० षटकांत ८ बाद ४९ धावा करता आल्या. त्यांच्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. दीपिकाने गोलंदाजीत कमाल करताना तीन विकेट्स घेतल्या. पवित्रा शेट्टी व सचिनी जयासिंघे यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. बहरिनने २६९ धावांनी हा सामना जिंकला. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटमहिला टी-२० क्रिकेट
Open in App