वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना २७ ऑक्टोबर रोजी चितगाव येथे खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात कॅरेबियन संघाने यजमान बांगलादेशवर १६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने विजय मिळवला असला तरी, बांगलादेशला शेवटच्या क्षणी विजयाची सुवर्णसंधी होती, मात्र तस्किन अहमदच्या विकेटमुळे सामन्याचे रूप पलटले.
सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात बांगलादेशी फलंदाज तस्किन अहमद बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. १९ व्या षटकात वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तस्किन अहमदने एक उत्तुंग षटकार मारला. मात्र, जोरदार फटका मारताना त्याचा पाय चुकून स्टंपला लागला. त्यामुळे नियमानुसार त्याला 'हिट विकेट' बाद देण्यात आले. त्यानंतर तस्किनला निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले आणि बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या.
चितगाव येथे नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून त्यांनी १६५ धावा केल्या. कर्णधार शाई होप (नाबाद ४६ धावा) आणि रोवमन पॉवेल (नाबाद ४४ धावा) यांनी आक्रमक खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. सलामीवीर अॅलिक अथानाझे आणि ब्रँडन किंग यांनी प्रत्येकी ३३ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून तस्किन अहमदने दोन आणि रिशाद हुसेनने एक विकेट घेतला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशकडून तन्झीम हसन सकीबने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर, तौहिद हृदॉयने २८ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या व्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे बांगलादेशला पराभवाचे तोंड पहावे लागले. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्स आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन, तर अकील हुसेनने दोन विकेट्स घेतले.