विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बॅकफूटवर - युवराज

Yuvraj Singh : युवराज पुढे म्हणाला की, ‘भारताला सरावासाठी ८-१० सत्रे मिळतील. मात्र, सराव सामन्याचे फायदे त्यातून मिळणार नाहीत. त्यामुळेच न्यूझीलंड संघाला सध्याच्या परिस्थितीचा फायदा होईल. भारताची फलंदाजी न्यूझीलंडच्या तुलनेत मजबूत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 05:13 IST2021-06-07T05:12:48+5:302021-06-07T05:13:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
the backfoot of the Indian team led by Virat Kohli - Yuvraj Singh | विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बॅकफूटवर - युवराज

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बॅकफूटवर - युवराज

नवी दिल्ली : ‘सध्याच्या व्यस्त वेळापत्रकाकडे पाहता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बॅकफूटवर असल्याचे वाटते. त्यामुळेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत केवळ एका सामन्याची न ठेवता, तीन सामन्यांची अंतिम मालिका खेळवायला पाहिजे’ असे मत भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने व्यक्त केले.

भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडला पोहचला. १८ जूनपासून सुरू होणाऱ्या या अंतिम लढतीसाठी भारताला सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्याचवेळी, न्यूझीलंड सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असल्याने त्यांचा संघ पूर्ण लयीमध्ये असेल. युवराजने सांगितले की, ‘माझे मत असे आहे की, अशा परिस्थितीमधे बेस्ट ऑफ थ्री कसोटी मालिका व्हायला पाहिजे. कारण जर तुम्ही पहिला सामना गमावला, तर तुम्ही नंतर पुनरागमन करु शकता. न्यूझीलंड संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे, त्यामुळेच सध्याची स्थिती भारतासाठी थोडी नुकसानकारक आहे.’

युवराज पुढे म्हणाला की, ‘भारताला सरावासाठी ८-१० सत्रे मिळतील. मात्र, सराव सामन्याचे फायदे त्यातून मिळणार नाहीत. त्यामुळेच न्यूझीलंड संघाला सध्याच्या परिस्थितीचा फायदा होईल. भारताची फलंदाजी न्यूझीलंडच्या तुलनेत मजबूत आहे. गेल्या काही काळामध्ये भारताने विदेशात चांगले विजय मिळवले आहेत. फलंदाजी तर मजबूत आहेच आणि आपली गोलंदाजीही न्यूझीलंडच्या तोडीस तोड आहे.’

रोहित शर्मा आणि शुभमान गिलविषयी युवी म्हणाला की, ‘रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेटमध्ये अनुभवी फलंदाज बनला आहे. त्याने ७ शतके झळकावली असून यातील ४ शतके त्याने सलामीला झळकावली आहेत. रोहित आणि शुभमान गिल यांनी इंग्लंडमध्ये कधीही सलामी दिलेली नाही. शिवाय ड्यूक्स चेंडू सुरुवातीला खूप स्विंग होतो. त्यामुळे दोघांनाही लवकरात लवकर परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.’

इंग्लंडमध्ये खेळताना एकावेळी एकाच सत्रावर लक्ष दिल्यास चांगले ठरेल. सकाळच्या सत्रात चेंडू स्विंग होईल आणि सीमवर पडेल. मात्र दुपारच्या सत्रापासून तुम्ही धावा काढू शकता. चहापानानंतर पुन्हा एकदा चेंडू स्विंग होतो. एक फलंदाज म्हणून या गोष्टींशी ताळमेळ साधला, तर तुम्ही यशस्वी ठरू शकता.
- युवराज सिंग

Web Title: the backfoot of the Indian team led by Virat Kohli - Yuvraj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.