Join us

Yuvraj Singh: तो परत येणार! युवराज सिंग पुन्हा मैदानात उतरणार; सिक्सर किंगची मोठी घोषणा

युवराज सिंग फेब्रुवारीत मैदानावर उतरणार; इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 12:33 IST

Open in App

मुंबई: भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा मैदानात उतरणार आहे. चाहत्यांच्या मागणी लक्षात घेऊन पुन्हा पीचवर उतरण्याचा निर्णय घेत असल्याचं युवराज सिंगनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपण कधी मैदानात उतरणार तेदेखील युवराजनं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. मात्र त्यानं कोणत्या मालिकेत किंवा सामन्यात खेळणार त्याबद्दल माहिती दिलेली नाही.

इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय?'देव तुमचं नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!', असं युवराजनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.  युवराज सिंगनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. २०१७ मध्ये युवराजनं इंग्लंडविरुद्ध कटकमध्ये १५० धावांची शानदार खेळी केली होती. त्या सामन्यात युवीनं १२७ चेंडूंत २१ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. त्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं १२२ चेंडूंमध्ये १३४ धावा केल्या होत्या.युवराजनं फेब्रुवारीत आपण परतणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानं मालिकेचं नाव सांगितलेलं नाही. रस्ते सुरक्षा मालिकेत युवराज खेळू शकतो, असा कयास आहे. गेल्या वेळेसही युवराजनं या मालिकेत सहभाग घेतला होता. त्यात युवराजची कामगिरी चांगली झाली होती. या मालिकेत युवराज सोबतच सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ यांचाही सहभाग असतो. जगातील माजी दिग्गज क्रिकेटपटूदेखील या मालिकेत पाहायला मिळतात.

टॅग्स :युवराज सिंग
Open in App