Join us  

आयसीसी क्रमवारीत विराटसेना नंबर वन, दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 5:48 AM

Open in App

दुबई, दि. 25 - कसोटीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने एकदिवसीय प्रकारातही अव्वल स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवले आहे. याआधी दक्षिण आफ्रिका प्रथम क्रमांकावर होती. पण ऑस्ट्रेलियावरील विजयाबरोबर भारतानं आफ्रिकाला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत भारत सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर टी 20 मध्ये पाचव्या स्थानावर आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारत 120 गुणासह प्रथम क्रमांकावर आहे. तर द. आफ्रिकेच्या नावावर 119 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाला मात्र 3 गुणांचे नुकसान झालं आहे. 117 वरुन त्यांचे गुण 114 गुण झाले आहेत. भारताविरोधातील तीन पराभवामुळे त्यांची क्रमवरीत घसरण झाली आहे. चौथ्या स्थानावर इंग्लंड आहे. त्यांच्या नावार 113 गुण आहेत . 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईसनुसार ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केला होता. तर कोलकातामध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 50 धावांनी विजय मिळवला. तर काल झालेल्या इंदूरमधील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटनं पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. कसोटीतही भारतीय संघ 125 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाचे 110 गुण आहेत.

तत्पूर्वी रोहित शर्मा (७१) व अजिंक्य रहाणे (७०) या मुंबईकर सलामीवीरांच्या आक्रमकतेनंतर हार्दिक पांड्याच्या (७८) तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने सलग तिस-या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने लोळवून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ६ बाद २९३ धावा उभारल्या. भारताने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केले. निर्णायक अष्टपैलू कामगिरी केलेल्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

विराट कोहली दिग्गजांच्या पंक्तीत...

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीयांनी विक्रमांची बरसात केली. त्यात कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला. धोनीकडून धुरा स्वीकारल्यानंतर विराटकडे नवख्या क्रिकेटपटूप्रमाणे पाहिले जात होते. आज त्याच युवा खेळाडूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयाचा रतीब नोंदवला. भारताला विराटने ३९ सामन्यांत ३० विजय मिळवून दिले. यात केवळ ७ पराभवांचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे, विराटच्या विजयाची सरासरी ही सर्वाधिक म्हणजे ती ८०.५५ टक्के आहे. अशी सरासरी भारताच्या कोणत्याही कर्णधाराची नाही. पहिल्या ३८ सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवून देण्याच्या यादीतही विराटने वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉयड आणि व्हिव रिचडर्स यांची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकीपॉँटिंग ३१ विजयांसह आघाडीवर असून विराट लवकरच त्यालाही मागे टाकेल. यासह आपल्याकडे नेतृत्वगुण असल्याचेही त्याने सिद्ध केले.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर विराटने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सलग ९ विजयांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ मध्ये सलग ९ एकदिवसीय सामने जिंकले होते. भारतीय संघाची ती सर्वाेत्कृष्ट कामगिरी होती. त्याची पुनरावृत्ती विराटने केली. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयक्रिकेटविराट कोहली