चेन्नई सुपर किंग्जने १७ वर्षीय आयुष म्हात्रेला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. आयुष म्हात्रे फलंदाजीसह आवश्यकता असल्यास ऑफ- स्पिन गोलंदाजी देखील करतो. आयपीएलच्या मेगा लिलावात चेन्नईच्या संघाने आयुषला ३० लाखात खरेदी केले. विशेष म्हणजे, आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात आयुष म्हात्रेची इतिहासात नोंद झाली आहे. चेन्नईकडून खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
याआधी आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा अभिनव मुकूल सर्वात युवा फलंदाज होता. मुकूलने वयाच्या १८ वर्षे १३९ व्या दिवशी चेन्नईकडून पहिला सामना खेळला होता. मात्र, आता आयुष म्हात्रे चेन्नईकडून आयपीएल खेळणारा आतापर्यंतचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आयुष म्हात्रेचे वय १७ वर्षे २७८ दिवस इतके आहे.
चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळणारे युवा खेळाडू१) आयुष म्हात्रे: १७ वर्षे २७८ दिवस- विरुद्ध मुंबई (२०२५)२) अभिनव मुकुंद: १८ वर्षे १३९ दिवस- विरुद्ध राजस्थान (२००८)३)अंकित राजपूत: १९ वर्षे १२३ दिवस- विरुद्ध मुंबई (२०१३)४) मथिशा पाथिराना: १९ वर्षे १४८ दिवस- विरुद्ध गुजरात (२०२२)५) नूर अहमद: २० वर्षे ७९ दिवस- विरुद्ध मुंबई (२०२५)
आयुष म्हात्रे कोण आहे?आयुषने २०२४-२५ च्या इराणी कपमध्ये मुंबईसाठी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३१.५० च्या सरासरीने ५०४ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून २ शतकेही झळकली आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक कहर केला. या ५० षटकांच्या स्थानिक स्पर्धेत त्याने ७ डावांमध्ये ६५.४२ च्या प्रभावी सरासरीने ४५८ धावा केल्या. या स्पर्धेत त्याने नागालँडविरुद्ध १८१ धावा केल्या. ज्यामुळे तो लिस्ट-ए क्रिकेटच्या जागतिक इतिहासात १५०+ धावा करणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. आयुष म्हात्रेचा जन्म १६ जुलै २००७ रोजी झाला, जेव्हा धोनीने पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. आज तो धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेकडून आयपीएलचा पहिला सामना खेळला आहे.
मुंबईविरुद्ध चेन्नईची प्लेईंग इलेव्हन:शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओवर्टन, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराना.