‘कभी हां, कभी ना’, जसप्रीत बुमराहबाबत हे काय चाललंय!

टी-२० विश्वचषकाला आता तीनच आठवडे शिल्लक आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने भारताच्या संभाव्य योजना अडचणीत आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 11:35 AM2022-10-02T11:35:25+5:302022-10-02T11:36:30+5:30

whatsapp join usJoin us
ayaz memon asked what is going on with jasprit bumrah | ‘कभी हां, कभी ना’, जसप्रीत बुमराहबाबत हे काय चाललंय!

‘कभी हां, कभी ना’, जसप्रीत बुमराहबाबत हे काय चाललंय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

टी-२० विश्वचषकाला आता तीनच आठवडे शिल्लक आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने भारताच्या संभाव्य योजना अडचणीत आल्या आहेत.  बुमराहची अनुपस्थिती हा टीम इंडियासाठी मोठा धक्का. तो भारतीय संघाच्या वेगवान माऱ्याचा मुख्य सूत्रधार नाही तर  जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. सर्व प्रकारात त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट असून आयपीएलद्वारे आंतरराष्ट्रीय पातळी गाठणाऱ्या या युवा गोलंदाजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळविली.

चेंडूवरील नियंत्रण, वेग आणि कौशल्यांच्या बळावर तो सर्वोत्कृष्ट फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतो. अल्पावधीतच बुमराह आक्रमणात इतरांना सल्ला आणि मार्गदर्शन करीत होता. बुमराहच्या अनुपस्थितीत ताकद आणि डावपेच कमी पडल्याने आशिया चषकात भारत ‘फ्लाॅप’ ठरला. विश्वचषकातदेखील बुमराहशिवाय भारतीय संघ म्हणजे प्रतिस्पर्धी संघाच्या आत्मविश्वासाचा ‘बूस्टर शॉट’ असेल. 

बुमराह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून विरोधाभासी संकेत मिळत आहेत. आधी बोर्डाने सांगितले की बुमराहला पाठदुखीमुळे विश्वचषकातून वगळण्यात आले आहे. एक दिवस उलटत नाही तोच अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुमराह अजूनही ऑस्ट्रेलियाकडे प्रस्थान करू शकतो, असे वक्तव्य केले. दौऱ्यासाठी तो तंदुरुस्त आहे की नाही हे पाहण्यासाठी बुमराहच्या चाचण्या सुरू झाल्या. तो जरी फिट वाटत असेल तरी स्पर्धेच्या कालावधीत टिकू शकेल?
 भारत सध्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे ‘प्ले ऑफ’ गाठण्याची अधिक आशा वाटते. याच आशेपोटी कदाचित गांगुलीने असे वक्तव्य केले असावे. दुसरीकडे बीसीसीआय व्यवस्थापन धास्तावलेले दिसते. बुमराह आठवडाभरात तंदुरुस्त होईल, याची त्यांना खात्री नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यास  मुकावे लागले तरी नंतरच्या सामन्यात बुमराह खेळू शकेल, अशी सर्वांना आशा असावी. हे जर-तरचे समीकरण आहे.
एनसीए आरोपीच्या पिंजऱ्यात…

मग प्रश्न उपस्थित होतो की बुमराह गेले काही आठवडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुनर्वसनात होता. त्यावेळी त्याच्यावर मेहनत घेणाऱ्यांनी नेमके केले तरी काय?

बुमराहचा कार्यभार निवडकर्ते आणि व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक हाताळत होते, टी-२० विश्वचषकातील त्याच्या सहभागाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात होते, प्रदीर्घ विश्रांतीनंतर परतलेला हा खेळाडू लगेचच डाऊन कसा काय झाला, एनसीएत सराव करीत असताना निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पूर्ण खात्रीनंतर खेळण्यास हिरवा झेंडा दाखविला की मग आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी घाई करण्यात आली होती, कारण कोणतेही असो, फटका मात्र भारतीय क्रिकेटला बसला आहे.

एक लक्षात घ्या, उत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक रवींद्र जडेजा वॉटर स्किइंग करताना जखमी झाला व बाहेर पडला. आता बुमराहचे खेळणे अनिश्चित असल्याने कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित अस्वस्थ झाले आहेत. बलाढ्य अंतिम एकादश खेळविण्याच्या अट्टाहासापोटी गोष्टी हळूहळू नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्या, असे म्हणायला वाव आहे.
 

Web Title: ayaz memon asked what is going on with jasprit bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.