ऑस्ट्रेलियाचा विश्वविजयी ‘षटकार’; दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी अपयश

महिला टी-२० विश्वविजेतेपद प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. यानंतर त्यांनी यजमानांना २० षटकांत ६ बाद १३७ धावांवर रोखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 05:32 AM2023-02-27T05:32:29+5:302023-02-27T05:32:56+5:30

whatsapp join usJoin us
Australia's world-beating 'six'; South Africa lost by 19 runs | ऑस्ट्रेलियाचा विश्वविजयी ‘षटकार’; दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी अपयश

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजयी ‘षटकार’; दक्षिण आफ्रिकेला १९ धावांनी अपयश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

केपटाऊन : संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा कायम राखताना महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावले. यजमान दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान १९ धावांनी परतावत कांगारुंनी बाजी मारली. यासह स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. यानंतर त्यांनी यजमानांना २० षटकांत ६ बाद १३७ धावांवर रोखले. लॉरा वॉल्वार्डट हिने दक्षिण आफ्रिकेकडून एकाकी झुंज देताना ४८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावा केल्या. तिचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना छाप पाडता आली नाही. 

विशेष म्हणजे पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला केवळ १ बाद २२ धावाच करता आल्या. ही संथ सुरुवात त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. यानंतर लॉराने आक्रमक फटकेबाजी करत यजमानांच्या आशा उंचावल्या, मात्र १७व्या षटकात मेगन शटने तिला पायचीत पकडत सामना कांगारुंच्या बाजूने झुकवला. त्याआधी,  आक्रमक सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाची वाटचाल समाधानकारक राहिली. सलामीवीर बेथ मूनीने पुन्हा एकदा आपला दणका देताना ५३ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ७४ धावा फटकावल्याने ऑस्ट्रेलियाला दीडशे पलीकडे मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने अलीसा हीली आणि बेथ मूनी यांच्या जोरावर आक्रमक सुरुवात केली. 

मात्र, पाचव्या षटकात हीली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ठरावीक अंतराने बळी गमावले. ऑस्ट्रेलियाच्या डावात एकही अर्धशतकी भागीदारी झाली नाही हे विशेष. मूनी आणि ॲश्ले गार्डनर यांनी दुसऱ्या बळीसाठी  ४१ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी केली. 

एका बाजूने टिकून राहिलेल्या मूनीने शानदार अर्धशतक झळकावत संघाला समाधानकारक मजल मारून दिली. शबनिम इस्माईल आणि कॅप यांनी प्रत्येकी दोन बळी घेत कांगारूंना मर्यादित धावसंख्येत रोखले.

दुसरी हॅट‌्ट्रिक
बलाढ्य ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वचषकातील आपला दबदबा दाखवून देताना सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. यासह त्यांनी विक्रमी दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेतेपदाची हॅट‌्ट्रिकही नोंदवली. ऑस्ट्रेलियाने याआधी, २०१०, २०१२ आणि २०१४ अशी सलग तीनवेळा टी-२० विश्वविजेतेपद पटकावले होते. याच कामगिरीची पुनरावृत्ती करत त्यांनी २०१८, २०२० आणि २०२३ अशी सलग तीन टी-२० विश्वविजेतेपद उंचावले.

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १५६ धावा (बेथ मूनी नाबाद ७४, ॲश्ले गार्डनर २९, अलीसा हीली १८; शबनिम इस्माईल २/२६, मरिझानी कॅप २/३५.) वि. वि. दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ६ बाद १३७ धावा (लॉरा वॉल्वार्डट ६१, श्लोइ ट्रायोन २५; ॲश्ले गार्डनर १/२०, जेस जोनासेन १/२१, मेगन शट १/२३, डार्सी ब्राऊन १/२०.)

Web Title: Australia's world-beating 'six'; South Africa lost by 19 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.