बडोदा : सलामीवीर निकोल बोल्टनची (नाबाद १०० धावा, १०१ चेंडू) आक्रमक शतकी खेळी व फिरकीपटूंच्या अचूक मा-याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सोमवारी झालेल्या पहिल्या लढतीत यजमान भारताचा ८ गडी राखून पराभव केला.
बोल्टनने कारकिर्दीतील चौथे एकदिवसीय शतक झळकावताना आॅस्ट्रेलियाला २०१ धावांचे लक्ष्य ३२.१ षटकांत गाठून दिले. अनुभवी एलिसे पेरीने विजयी चौकार लगावला. तिने नाबाद २५ धावांची खेळी केली.
त्याआधी, पूजा वस्त्रकार (५१) व सुषमा वर्मा (४१) यांनी आठव्या विकेटसाठी केलेल्या ७६ धावांच्या भागीदारीमुळे भारताला २०० धावांचा पल्ला गाठता आला. नाणेफेक जिंंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारताने नियमित अंतरामध्ये विकेट गमावल्या. त्यानंतर पूजा व सुषमा यांनी भागीदारी करीत संघाला २०० धावांची मजल मारून दिली. १८ वर्षीय पूजाचे हे पहिलेच अर्धशतक आहे. तिने ७ चौकार व १ षटकार मारला. सुषमाने ७१ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार लगावले. ३२ षटकांत भारताची ७ बाद ११३ अशी अवस्था होती.
पूनम राऊत (३७) व स्मृती मानधना (१२) यांनी ९ षटकांत ३८ धावांची भागीदारी केली. मानधनाला अमांडा जेड वेलिंग्टनने पायचित केले. जेस जोनासेनने ३० धावांत ४ तर अमांडाने ३ बळी घेतले.
जेमिमा रॉड्रिग्ज व राऊत पाठोपाठ बाद झाल्यानंतर २३ व्या षटकात भारताची ४ बाद ८३ अशी अवस्था झाली. यासह आॅसीने विश्वकप उपांत्य फेरीत भारताविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपाही काढला.
>संक्षिप्त धावफलक
भारत महिला : ५० षटकात सर्वबाद २०० धावा (पूजा वस्त्राकार ५१, सुषमा वर्मा ४१, पूनम राऊत ३७; जेस जोनास्सेन ४/३०, अमांडा जेड वेलिंग्टन ३/२९) पराभूत वि. आॅस्टेÑलिया महिला : ३२.१ षटकात २ बाद २०२ धावा (निकोल बोल्टन नाबाद १००, अलिसा हिली ३८, मेग लॅनिंग ३३, एलिस पेरी नाबाद २५; शिखा पांड्ये १/३८)