Join us
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नवत मोहिमेत ऑस्ट्रेलियाचे आव्हान; महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज  

आफ्रिका संघाने उपांत्य सामन्यात झुंझारवृत्तीचा परिचय देत इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. ऑस्ट्रेलियाला नमविण्यासाठी अशाच कामगिरीची त्यांच्याकडून अपेक्षा असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 05:24 IST

Open in App

केपटाऊन : महिला टी-२० विश्वविजेतेपदाच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिका संघासमोर पाचवेळा विश्वविजेत्या राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. रविवारी सायंकाळी ६.३० पासून रंगणाऱ्या या सामन्यात यजमान संघाला विश्वचषकावर नाव कोरायचे झाल्यास सातव्यांदा अंतिम सामना खेळणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान मोडीत काढावे लागेल.

आफ्रिका संघाने उपांत्य सामन्यात झुंझारवृत्तीचा परिचय देत इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. ऑस्ट्रेलियाला नमविण्यासाठी अशाच कामगिरीची त्यांच्याकडून अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियाला हरविणे सोपे नसल्याची जाणीव आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या आफ्रिका संघाला आहे.

मागच्या वर्षभरात त्यांनी खेळात प्रगती केली. मागच्या वर्षी द. आफ्रिका संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला होता. लॉरा वूलफार्ट आणि ताजमिन ब्रिट्स ही सर्वोत्कृष्ट सलामी जोडी संघात आहे. ब्रिट्स भालाफेकीची माजी ज्युनिअर विश्वविजेती असून, २०१२ ला झालेल्या कार अपघातामुळे तिचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडायचे झाल्यास सलामी जोडीकडून झकास सुरुवात होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानेदेखील रोमहर्षक उपांत्य सामन्यात भारतावर पाच धावांनी मात करीत अंतिम फेरी गाठली.

यजमान संघात अष्टपैलू मारिजेन काप, कर्णधार सुने लुस, गोलंदाज  शबनिम इस्माइल आणि अयाबोंगा खाका या उपयुक्त खेळाडू आहेत. फायनलमध्ये त्यांना प्रेक्षकांचादेखील भरपूर पाठिंबा लाभणार आहे. मात्र, यामुळे दडपण येणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल.

ऑस्ट्रेलिया संघात प्रत्येक विभागात बलाढ्य खेळाडूंचा भरणा आहे. हा संघ अखेरच्या चेंडूपर्यंत हार मानत नाही, हे भारताविरुद्ध स्पष्ट झाले. परिस्थिती अनुकूल नसेल तर विजय कसा मिळवायचा हेदेखील मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाला चांगले अवगत आहे.

‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’च्या दावेदारनताली स्कीवर ब्रंट (इंग्लंड) - २१६ धावा, ३ झेल, सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) - ११ बळी, मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) - १३९ धावा,   एलिसा हिली - (ऑस्ट्रेलिया) - १७१ धावा, रिचा घोष (भारत) - १३६ धावा, हेली मॅथ्यूज (वेस्टइंडीज) - १३० धावा, ४ बळी, ४ झेल, ॲश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) - ८१ धावा, ९ बळी.   लॉरा वोलवार्ट (दक्षिण आफ्रिका) - १६९ धावा,   तजमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका) - १७६ धावा, ६ झेल.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेट
Open in App