Join us

INDW vs AUSW: खुशखबर! भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचे सामने पाहता येणार फ्री; मुंबईत रंगणार थरार

भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या घरात 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 18:35 IST

Open in App

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या घरात 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय महिला 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या व्यासपीठावर दिसणार आहे, तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. खरं तर हे दोन्ही संघ शेवटच्या वेळ राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिडले होते. मात्र भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

लक्षणीय बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या आगामी ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची प्रमुख खेळाडू पूजा वस्त्राकरला दुखापत झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय स्नेह राणा ही देखील आगामी मालिकेचा हिस्सा नसणार आहे. 

मुंबईत रंगणार थरार लक्षणीय बाब म्हणजे या मालिकेच्या 3 दिवस आधी एक खुशखबर समोर आली आहे. कारण आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील पाचही सामने स्टेडियममध्ये विनामुल्य पाहता येणार आहेत. बीसीसीआयच्या या घोषणेमुळे महिला क्रिकेटला प्राधान्य मिळेलच यासह चाहत्यांचे मनोरंजनही मोफत होईल आणि अधिकाधिक लोकांना महिला क्रिकेट जवळून पाहता येईल. या मालिकेतील पहिले 3 सामने नवी मुंबईतील डि वाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. तर अखेरचे दोन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. 

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.

नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर. 

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 
  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 
  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
  • भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App