Join us  

World Record : ऑस्ट्रेलियन संघाने रचला इतिहास; मोडला 20 वर्षांपूर्वीचा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:07 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. श्रीलंकेच्या 8 बाद 195 धावांचा ऑस्ट्रेलियाने 26.5 षटकांत 1 विकेट गमावून यशस्वी पाठलाग केला. अॅलीसा हिलीनं नाबाद शतकी खेळी करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने महिला क्रिकेटमधील 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 बाद 195 धावा केल्या. त्यात चमारी अटापट्टूच्या 103 धावांचा समावेश होता. तिनं 124 चेंडूंत 13 चौकारांसह 103 धावांची खेळी केली. तिला अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ न मिळाल्यानं लंकेला 195 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या मीगन स्कट ( 2/44) आणि जॉर्जिया वारेहॅम ( 2/18) यांनी उत्तम गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या राचेल हायनेस आणि हिली यांनी पहिल्या विकेटसाठी 159 धावा करून विजय निश्चित केला. हायनेस 74 चेंडूंत 7 चौकारासह 63 धावा करून माघारी परतली. हिलीनं 76 चेंडूंत 15 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 112 धावा केल्या. लॅनिंग 20 धावांवर नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाचा हा विजय विक्रमी ठरला. ऑस्ट्रेलियानं 2018-19 या कालावधीत सलग 18 वन डे सामने जिंकण्याचा पराक्रम केला. महिला क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियानेच 1997-99 या कालावधीत सलग 17 सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. तिसऱ्या स्थानावरही ऑस्ट्रेलियाचा संघ ( 16 सामने 1999-2001) आहे.

2018च्या सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन महिला संघाने 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यापैकी 3मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियन महिलांनी 2018च्या सुरुवातीपासून 18 वन डे सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. 26 ट्वेंटी-20 सामन्यांत 23 विजय व 3 पराभव, तर 1 कसोटी सामना अनिर्णीत सुटला आहे.  

टॅग्स :आॅस्ट्रेलियाश्रीलंका