भारताचा प्रमुख स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या डावात ट्रॅविस हेडची शिकार करत कसोटी कारकिर्दीतील दोनशे विकेट्सचा खास पल्ला पार केला. सर्वात कमी सरासरीनं हा पल्ला गाठत जसप्रीत बुमराह क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज ठरला आहे. भारताच्या या गोलंदाजानं १९.५ च्या सरासरीने कसोटीत २०० विकेट्स मिळवण्याचा पल्ला गाठला आहे. मॅक्लम मार्शल २०.९ यांना मागे टाकत तो सरासरीच्या बाबतीत क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज ठरतो. एवढेच नाही ट्रॅविस हेड पाठोपाठ मिचेल मार्शची विकेट घेत त्याने बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.
ट्रॅविस हेडची शिकार करत बुमराहनं साधला 'द्विशतकी' डाव
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या डावात सलामीवीर सॅमच्या रुपात बुमराहनं संघाला पहिलं यश मिळवून दिले होते. त्यानंतर बुमराहनं ५-३-२ असे स्पेल टाकले. ट्रॅविस हेड मैदानात आल्यावर रोहितनं पुन्हा चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती दिला. कर्णधाराचा विश्वास सार्थ करत जसप्रीत बुमराहनं ट्रॅविसह हेडला पहिल्याच चेंडूवर नितीशकुमार रेड्डीकरवी झेलबाद केले. यासह कसोटीमध्ये बुमराहनं २०० विकेट्सचा पल्ला पार केला. ४४ व्या डावात त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्यापेक्षा जलदगतीने हा पल्ला गाठणाऱ्या गोलंदाजांमध्ये फक्त आर.अश्विन त्याच्यापुढे आहे. अश्विननं ३७ डावात हा टप्पा गाठला होता.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम
ट्रॅविस हेडच्या विकेटसह जसप्रीत बुमराहनं बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बेन हिल्फेनहॉस विक्रमाशी बरोबरी केली. या ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं २०११-१२ च्या स्पर्धेत २७ विकेट्स घेतल्या होत्या. मेलबर्न कसोटीत मिचेल मार्श आणि एलेक्स कॅरी यांना तंबूचा रस्ता दाखवत बुमरहानं हा विक्रम मोडीत काढला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जलगती गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह २९ *विकेट्ससह अव्वलस्थानावर आहे.
जम्बो विक्रम मोडला, अश्विनची बरोबरी करत आता हरभजन सिंगच्या विक्रमावर नजरा
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या नावे आहे. भज्जीनं २००१-०२ च्या हंगामात ३२ विकेट्स घेतल्या होत्या. आर अश्विन याने २०१२-१३ च्या हंगामात २९ विकेट्स घेतल्या होत्या. अनिल कुंबळे यांनी २००४-०५ मध्ये २७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.