AUS vs IND, Rohit Sharma LBW Scott Boland's Delivery : अॅडिलेडच्या मैदानात रंगलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा कॅप्टन रोहित शर्माचा डाव चांगलाच फसला. लोकेश राहुलसाठी ओपनिंगची जागा सोडणारा रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
हिटमॅनची स्लो इनिंग, तोरा बदलला पण संकटमोचक नाही ठरला
आपल्या भात्यातील फटकेबाजीमुळे हिटमॅन या नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा आघाडीच्या विकेट्स लवकर पडल्यामुळे अगदी संयमी अंदाजात खेळताना दिसला. पण त्याचा हा संयमी बाणा अधिक काळ टिकला नाही. २२ मिनिटे मैदानात खेळताना २३ चेंडूचा सामना करून तो अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला. बोलंड याने रोहित शर्माला पायचित केले. अनेक वर्षात कधीच तो एवढ्या संथ गतीने फलंदाजी करताना दिसलेला नाही. त्यामुळेच सोशल मीडियावर रोहितची ही इनिंग चर्चेत आली आहे. या इनिंगनंतर पुन्हा एकदा नेटकरी त्याला निवृत्तीचा सल्ला देऊ लागले आहेत.
अनेक वर्षांनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता रोहित
रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ही याच क्रमांकावर फलंदाजी करताना केली होती. २०१३ ते २०१८ या कालावधीत तो याच क्रमांकावर खेळायचा. पण गेल्या काही वर्षांत तो सातत्याने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसला. कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे दिसून येते.
सहाव्या क्रमांकावर कशी राहिलीये कामगिरी?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी सहाव्या क्रमांकावर २५ वेळा फलंदाजी करताना रोहित शर्मानं ३ शतके आणि ६ अर्धशतकासह ५४.५७ च्या सरासरीनं १०३७ धावा काढल्या होत्या. कोणत्याही क्रमांकावरील त्यानं या क्रमांकावर सर्वोत्तम सरासरीनं धावा केल्या आहेत. पण यावेळी मात्र त्याच्या पदरी निराशा आली आहे.