भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मात्र, त्याआधीच क्रिकेट जगतात खळबळ माजवणारी घटना आली. मेलबर्नमध्ये नेट प्रॅक्टिस करत असताना चेंडू लागल्याने एका युवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती आहे.
ही हृदयद्रावक घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:४५ वाजता मेलबर्नच्या आग्नेय भागातील फर्न्ट्री गली येथील व्हॉली ट्यू रिझर्व्ह येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फर्न्ट्री गली आणि एल्डन पार्क यांच्यातील टी-२० सामन्यापूर्वी युवा खेळाडू नेटमध्ये सराव करत असताना एक उसळलेला चेंडू त्याच्या डोक्यावर लागला.
खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागताच उपस्थित सहकारी खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी लगेच परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तातडीने मोबाईल इंटेन्सिव्ह केअर रुग्णवाहिका आणि लाईफ पॅरामेडिक्स पोहोचले. त्यांनी खेळाडूला प्रथमोपचार देऊन गंभीर अवस्थेत असलेल्या त्याला मोनाश मेडिकल सेंटरमध्ये नेले.
सध्या या क्रिकेटपटूची प्रकृती चिंताजनक असून, तो रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. या अपघातामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. क्रिकेट चाहते आणि खेळाडू या युवा क्रिकेटपटूच्या त्वरित आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.