Join us  

"दोघांना एका खोलीत आणेन आणि...", वॉर्नर -जॉन्सन वादात आता रिकी पाँटिंगची उडी 

Ricky Ponting On Warner-Jonson Controversy : डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 8:06 PM

Open in App

Warner-Jonson Controversy : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट वर्तुळात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन हे दोघेही नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहेत. दोघांमध्ये वाद चिघळला असताना आता या वादात ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगने उडी घेतली. या दिग्गज खेळाडूने आता माध्यमांमध्ये हे प्रकरण पुढे येऊ नये यासाठी उपाय सुचवला आहे. त्याने वॉर्नर आणि जॉन्सनला एका खोलीत बसवून चर्चेद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगितले.

पाँटिंगने सांगितले की, आता मला कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागेल. या दोघांना एका खोलीत आणण्यासाठी मी मध्यस्थी करेन पण त्यांनी माध्यमांसमोर काही बोलू नये. माध्यमांमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी दोघांनीही एकमेकांशी बोलून यावर तोडगा काढायला हवा. दोघेही खूप संतापले असून हे प्रकरण ६ ते ८ महिने जुने असल्याचे आम्हाला माहीत आहे. ॲशेस मालिकेसाठी निवडीच्या वेळी हा वाद सुरू झाला. हे असेच चालू राहिले कारण दोघेही समोरासमोर बसून त्यावर बोलले नाहीत. पण हे आता घडावे अशी माझी इच्छा आहे. पाँटिंग एका वृत्तवाहिनीशी बोलत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. १४ डिसेंबरपासून पाकिस्तानविरुद्ध सुरू होणारी तीन सामन्यांची मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका असणार आहे. याचाच दाखला देत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने एका लेखाद्वारे वॉर्नरवर निशाणा साधला होता. त्यांने लिहिले होते की, सॅँड पेपर प्रकरणात दोषी ठरलेल्या वॉर्नरला हिरोसारखा निरोप का दिला जात आहे? खराब फॉर्म असूनही वॉर्नरला कसोटी संघात का स्थान देण्यात आले? जॉन्सनच्या या लेखानंतर वाद चिघळला आणि तो अद्याप सुरूच आहे. 

पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ  -पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, लॉन्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

  1. पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)
  2. दुसरा सामना - २६ ते ३०  डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  3. तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड) 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाआंतरराष्ट्रीय क्रिकेट