मेलबोर्न : ॲडिलेडमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताची जखम ताजी आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे चार कसोटी सामन्याच्या मालिकेत क्लीन स्वीप देण्याची चांगली संधी आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने म्हटले आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव ३६ धावात संपुष्टात आला. भारताची कसोटी इतिहासातील ही नीचांकी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाने ही लढत ८ गडी राखून जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली. पाँटिंग म्हणाला, ‘भारतावर मोठा आघात झाला असून, यजमान संघाकडे क्लीन स्वीपची चांगली संधी आहे. मेलबोर्नमध्ये सकारात्मक निकालाची आशा बाळगायला हवी. जर आपण यात यशस्वी ठरलो तर भारताकडे पुनरागमन करण्याची संधी राहणार नाही. अशास्थितीत भारत एकही सामना जिंकणार नाही.’
भारताला उर्वरित तीन कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीची उणीव भासेल. तो पितृत्व रजेसाठी मायदेशी परतणार आहे. पाँटिंग म्हणाला की, ‘अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघापुढे पुनरागमन करण्याची मोठी परीक्षा राहील.’