ॲडिलेड : मिशेल स्टार्क आणि नाथन लियोन यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंड संघाने गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र कसोटीत तिसऱ्या दिवशी शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियाच्या ४७३ धावांपुढे त्यांचा पहिला डाव २३६ धावात संपुष्टात आला. यानंतरही ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात ४५ धावा केल्यामुळे त्यांची एकूण आघाडी २८२ इतकी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीवर पूर्ण पकड मिळविल्याचे संकेत मिळत आहेत. खेळ थांबला त्यावेळी मार्कस हॅरिस २१ आणि मायकेल नेसर २ धावा काढून नाबाद होते.
त्याआधी इंग्लंडने कालच्या २ बाद १७ वरून सुरुवात केली. कर्णधार ज्यो रुट याने अर्धशतक पूर्ण केले, पण ६२ धावांवर त्याची एकाग्रता भंगली. यानंतर बेन स्टोक्सने ३४ धावांचे योगदान दिले. डेव्हिड मलान हा शतकाकडे वाटचाल करीत असताना मिशेल स्टार्कने त्याला ८० धावांवर माघारी धाडले. इंग्लंडचा प्रत्येक फलंदाज पाठोपाठ माघारी फिरला. तळाच्या स्थानावर आलेल्या वोक्सने २४ धावांचे योगदान दिले, तरी इंग्लंड संघ २३७ धावांनी माघारला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने चार, नाथन लियोनने तीन तर पहिली कसोटी खेळणारा मायकेल नेसर याने एक गडी बाद केला, तर अष्टपैलू मॉरिस ग्रीन याने दोन बळी घेतले. इंग्लंडने आज ८६ धावांत अखेरचे आठ फलंदाज गमावले.
- इंग्लिश कर्णधार ज्यो रूट याने एका कॅलेंडर वर्षांत धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांना मागे टाकले. आज ६२ धावा ठोकणाऱ्या रुटने १४ कसोटीतील २६ डावांत १६०६ धावा केल्या आहेत.
- कॅलेंडर वर्षात सर्वधिक धावा ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ (वर्ष २००६, १७८८ धावा) याच्या नावावर आहे. विव्हियन रिचर्ड्स यांनी १७१०, ग्रॅमी स्मिथ १६५६, मायकेल क्लार्क १५९५, सचिन १५६२ आणि गावसकर यांनी १५५५ धावा केल्या होत्या.