नवी दिल्ली : आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी रवाना होण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मालदीव येथे क्वारंटाईन झाले आहेत. या काळात दोन दिवसांआधी चीनचे अनियंत्रित रॉकेट मालदीवनजीक हिंदी महासागरात कोसळले.
या घटनेमुळे सर्व खेळाडू घाबरले होते, असा खुलासा डेव्हिड वाॅर्नरने केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास जोरदार आवाज झाल्यामुळे आम्ही सर्वजण खळबळून जागे झालो, असे वॉर्नरने सांगितले. यादरम्यान कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही.
‘द ऑस्ट्रेलियन’शी बोलताना वॉर्नर म्हणाला, ‘आम्ही रिसॉर्टमध्ये साखरझोपेत होतो. काहींनी ही घटना कॅमेऱ्यात टिपली. हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात ऊल्कापात झाल्यासारखी अवजड वस्तू कोसळताना दिसत आहे.’