Join us  

IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकावर ऑसी फलंदाजांनी फिरवलं पाणी; पृथ्वी शॉचा सुपर कॅच, Video

AUSA vs INDA : कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 07, 2020 10:55 AM

Open in App

कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) शतकी खेळी करताना भारत अ संघाचा डाव सारवला. रहाणेच्या नाबाद ११७ धावांच्या जोरावर भारत अ संघानं ९ बाद २४७ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचा निम्मा संघ ९८ धावांवर परतला होता, परंतु कॅमेरून ग्रीन आणि टीम पेन यांनी दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला कमबॅक करून दिले. ही डोईजड जोडी उमेश यादवनं तोडली. पृथ्वी शॉ यानं अफलातून झेल घेताना पेनला माघारी जाण्यास भाग पाडले.

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि वृद्धीमान सहा भोपळ्यावर माघारी परतले. पण, चेतेश्वर पुजारा ( ५४) आणि रहाणे ( ११७) यांनी टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. रहाणेनं २४२ चेंडूंत १८ चौकार व १ षटकारासह नाबाद ११७ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं डाव घोषित केला. उमेश यादवनंही १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २४ धावांची आक्रमक खेळी केली. रहाणे व कुलदीप यादव या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कुलदीपनं ७८ चेंडूंत १५ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाचे सलामीवीरही अपयशी ठरले. विल पुकोवस्की ( १) आणि जो बर्न्स ( ४) यांना उमेश यादवनं माघारी पाठवलं. मार्कस हॅरिस ( ३५),  कर्णधार ट्रॅव्हीस हेड ( १८) आणि निक मॅडीन्सन ( २३) यांनी ऑसींचा डाव सावरला, परंतु ते ९८ धावांवर माघारी परतले. ५ बाद ९८ अशा अवस्थेत सापडलेल्या ऑसींसाठी ग्रीन व पेन ही जोडी धावली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. उमेश यादवनं ही जोडी तोडली. टीम पेन ८८ चेंडूंत ४ चौकारांसह ४४ धावांवर माघारी परतला. पृथ्वी शॉनं त्याला सुरेख झेल टिपला. ६४ षटकांत ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २१६ धावा झाल्या होत्या.. ग्रीन ८२ धावांवर खेळत असून ऑसी अजून ३१ धावांनी पिछाडीवर आहे.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघ