Join us  

स्टीव्ह स्मिथची पहिल्याच चेंडूवर विकेट अन् गोलंदाजाची ८५ वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी

AUS vs WI 1st Test : वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज शामर जोसेफ ( Shamar Joseph ) याने दणक्यात पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 3:07 PM

Open in App

AUS vs WI 1st Test  ( Marathi News ) -   वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज शामर जोसेफ ( Shamar Joseph ) याने दणक्यात पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत त्याने स्टीव्ह स्मिथसारख्या दिग्गज फलंदाजाची विकेट मिळवली. एडिलेड ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला गेला आणि त्यानंतर जोसेफने स्वप्नवत सुरुवात केली. नवव्या षटकात त्याला गोलंदाजीला आणले गेले आणि पहिल्याच चेंडूवर त्याने स्मिथची विकेट घेतली. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर स्मिथकडे सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जोसेफने या विकेटमुळे ८५ वर्ष जुन्या विक्रमाशी बरोबरी केली.  वेस्ट इंडिजचा पहिला डाव १८८ धावांवर गुंडाळला गेला. जोश हेझलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. विंडीजकडून किर्क मॅकेंझी ( ५०) याने एकट्याने खिंड लढवली. त्यानंतर स्मिथ व उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. स्मिथ १२ धावांवर असताना विंडीजने गोलंदाजीत बदल केला आणि जोसेफला आणले. २४ वर्षीय गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर स्मिथ चुकला आणि चेंडू त्याच्या बॅटला लागून स्लिपच्या दिशेने गेला. जस्टीन ग्रेव्हेसने हा झेल घेतला. 

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा जोसेफ हा टायरेल जॉन्सन यांच्यानंतर दुसरा विंडीज गोलंदाज ठरला. जॉन्सनने १९३९ मध्ये इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता. कसोटीत एकून पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जोसेफ २३ वा खेळाडू आहे. जोसेफने दुसरी विकेट घेताना मार्नस लाबुशेनला ( १०) माघारी पाठवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २ बाद ५९ धावा केल्या आहेत आणि ते १२९ धावांनी पिछाडीवर आहेत. जोसेफने ६ षटकांत १८ धावा देताना २ विकेट्स घेतल्या.  या विकेट्सचा फोटो मी घरी फ्रेम करून लावणार असल्याचे जोसेफने सांगितले.  

टॅग्स :वेस्ट इंडिजआॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथ