Join us  

AUS vs SA: सिक्स, विकेट, नो बॉल अन् जीवनदान; एक चेंडू आणि नाट्यमय घडामोडी, Video

AUS vs SA ODI: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान एक नाट्यमय घडामोडी घडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 8:33 PM

Open in App

Alana King Wicket: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील तिसरा सामना शनिवारी सिडनीतील नॉर्थ सिडनी ओव्हल मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात एक विचित्र घटना घडली, जी पाहून सगळेच अवाक् झाले. बरोबर टप्प्यात आलेल्या चेंडूचा फायदा घेत फलंदाजाने जोरदार फटका मारून चेंडू सीमापार पाठवला. नंतर मात्र फलंदाजाचा तोल गेल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू हिट विकेटची बळी ठरली. विशेष बाब म्हणजे मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी दिलेल्या निर्णयाने ऑस्ट्रेलियाला सुखद धक्का बसला.

खरं तर झाले असे की, ऑस्ट्रेलियन फलंदाज अलाना किंगने फुल टॉस चेंडूवर षटकार मारला. पण तिचा तोल गेल्याने त्रिफळा उडाला. मात्र, हा चेंडू नो बॉल असल्याने तिला जीवनदान मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ४८व्या षटकात ही घटना घडली. स्टार अष्टपैलू खेळाडू अलाना किंग फलंदाजी करत होती. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मसबत क्लास गोलंदाजी करत होती. मसबतने टाकलेला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्यात अलानाला यश आले. पण तिला तोल सांभाळता आला नाही अन् ती हिट विकेट बाद झाली. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडू हिट विकेट बाद झाली असताना देखील मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी तिला बाद दिले नाही. खरं तर पंचांनी तो नो बॉल घोषित केला. यामुळेच अलानाला बाद घोषित केले नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मैदानावरील ही नाट्यमय घडामोड पाहून संपूर्ण ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये एकच हशा पिकला. ऑस्ट्रेलियन कर्णधार लिसा हिली देखील अवाक् झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ५० षटकात ९ बाद २७७ धावा केल्या. यजमान ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वाधिक ८० धावांची नाबाद खेळी खेळून संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २४.३ षटकांत अवघ्या १२७ धावांवर गारद झाला. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाद. आफ्रिकासोशल व्हायरल