अबूधाबी : सराव सामन्यात अडखळत खेळलेल्या ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडावे लागेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडला नमवले, मात्र दुसऱ्या सामन्यांत त्यांना भारताविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागला होता. दोन्ही सामन्यात कांगारुंच्या फलंदाजीतील कमकुवतपणा समोर आल्याने आफ्रिकेविरुद्ध त्यांना फलंदाजीत सुधारणा करावीच लागेल.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांना टी-२० विश्वविजेतेपद पटकावण्यात यश आलेले नाही. त्यामुळे दोन्ही संघ पहिले विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने आपल्या मोहिमेची सुरुवात करतील. या स्पर्धेआधी झालेल्या द्विपक्षीय मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला बांगलादेश, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंड यांनी नमवले असल्याने ऑस्ट्रेलियाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. शिवाय मानसिकरीत्याही ते मागे असतील. अनुभवी आणि प्रमुख फलंदाज डेव्हीड वॉर्नर सध्या फॉर्म हरवून बसल्याने ऑसी संघ दडपणात आहे. सराव सामन्यातही त्याची कामगिरी ० आणि १ धावा अशी राहिली. शिवाय गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून परतलेला कर्णधार ॲरोन फिंचही पूर्णपणे लयीत नाही.