Join us  

Aus vs Pak : पाकिस्तानचा संपूर्ण संघ कसोटीच्या पहिल्याच दिवशी तंबूत; स्टार्कचा भेदक मारा

नाणेफेकिचा कौल बाजूनं लागूनही पाकिस्तान संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 1:11 PM

Open in App

नाणेफेकिचा कौल बाजूनं लागूनही पाकिस्तान संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आणि पाकचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपुष्टात आला. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. असद शफिक वगळता अन्य फलंदाजांनी घोर निराशा केली. पाकिस्तानचा पहिला डाव 240 धावांवर गडगडला. स्टार्कनं सर्वाधिक चार, तर कमिन्सनं तीन विकेट्स घेतल्या.

शान मसूद आणि कर्णधार अझर अली यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. पण, कमिन्सनं ही जोडी तोडली. त्यानं मसूदला 27 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लियॉन यांनी पाकच्या मधल्या फळीला गुंडाळलं. अली 39 धावांत बाद झाला. बाबर आझमला केवळ एकच धाव करता आली. असद आणि यासीर शाह यांनी सातव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी करताना पाकचा डाव सावरला. पण, त्यांना मोठी मजल मारता आली नाही. असदनं 76 धावांची खेळी केली. यासीरनं 26, तर मोहम्मद रिझवाननं 37 धावा केल्या.

या सामन्यात नसीम शाहनं सर्वांचे लक्ष वेधलं. पाकिस्तानचा युवा क्रिकेटपटू नसीम शाहच्या आईचे आठवड्याभरापूर्वी निधन झाले. पण आता तो संघाबरोबर आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना आजपासून सुरू झाला आणि त्यात नसीमला खेळण्याची संधी मिळाली. 16 वर्ष आणि 279 दिवसांच्या नसीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून युवा कसोटीवीरांमध्ये स्थान पटकावले. पण, अवघ्या 74 दिवसांच्या फरकानं त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडता आला नाही.

पाक संघात 'कुमार' खेळाडूची एन्ट्री; तेंडुलकरचा विक्रम थोडक्यात मोडता मोडता राहिला

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान