AUS vs IND 2nd ODI Rohit Sharma becomes the first Indian batter to score 1000 runs in Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्मानं मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. रोहित शर्मानं संययमीरित्या सुरुवात करताना या सामन्यात ऑस्ट्रेलियन मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १००० धावांचा पल्ला गाठला. वनडेत कांगारुंच्या संघाविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
दिग्गजांच्या खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
भारतीय सलामीवीराने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चौकार लगावत पहिल्या डावातील तिसऱ्या षटकात हे लक्ष्य गाठले. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानात १००० धावा करणारा क्रिकेट जगतातील पाचवा फलंदाज आहे. या कामगिरीसह त्याने वेस्ट इंडिजचे दिग्गज विव रिचर्ड्स, डेसमंड हेनस, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या एलिट क्लबमध्ये सहभागी झाला आहे.
रोहित धीम्या गतीनं सुरुवात, सहा वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
रोहितनं आपल्या पहिल्या २० चेंडूत केवळ ६ धावा केल्या. याआधी त्यानं २०१९ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० चेंडूचा सामना करून ५ धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. सहा वर्षांनी त्याने धीमी सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.