Join us

ॲशेस कसोटी: दुसऱ्या दिवशी १७ फलंदाज झाले बाद; इंग्लंड सर्वबाद १८८

दुसऱ्या दिवसाच्या खेळात एकूण १७ गडी बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 05:52 IST

Open in App

होबार्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीचा दुसरा दिवस गोलंदाजांचा ठरला. पहिल्या डावात ३०३ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला १८८ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ३७ धावांवरच तीन धक्के दिले. दुसऱ्या दिवसाच्या खेळात एकूण १७ गडी बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. पहिल्या डावातील आघाडीच्या भरवशावर ऑस्ट्रेलियाकडे आता एकूण १५२ धावांची आघाडी आहे. होबार्ट येथे सुरू असलेल्या या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडला आपल्या पहिल्या डावात केवळ १८८ धावाच करता आल्या. कर्णधार पॅट कमिन्सने घेतलेल्या चार बळींमुळे इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी धावसंख्या गाठता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी प्राप्त झाली.  मात्र दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावाप्रमाणे डेव्हीड वॉर्नर पुन्हा शून्यावर बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडने त्याला पोपकरवी झेलबाद केले. त्यानंतर मार्नस लाबूशेनचा काटा काढत ख्रिस वोक्सने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. मार्क वूडने फॉर्मात असलेल्या उस्मान ख्वाजाला स्वस्तात माघारी परतवले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ १७ आणि स्कॉट बोलंड हे ३ धावांवर खेळत आहेत.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019
Open in App