Auqib Nabi BCCI Awards 2026: भारतीय क्रिकेट सध्या जगभरात सर्वोत्तम स्थितीत असलेली क्रिकेट यंत्रणा मानली जाते. भारतातून कायम उदयोन्मुख नवे खेळाडू घडताना दिसत आहेत. अशाच एका नव्या दमाच्या खेळाडूचा BCCI कडून सन्मान केला जाणार आहे. जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट इतिहासात २०२५-२६च्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना पळता भुई थोडी करणाऱ्या आकिब नबी याला बीसीसीआयकडून खास गिफ्ट दिले जाणार असल्याची माहिती आहे.
सर्वात जास्त बळी
आकिब नबीने रणजी ट्रॉफी २०२५ च्या एकाच हंगामात तब्बल ६० बळी घेण्याचा पराक्रम केला. या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला. रणजी करंडकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला बीसीसीआयतर्फे 'माधवराव शिंदे पुरस्कार' (Madhavrao Scindia Award) दिला जातो. तो यंदा आकिबला मिळणार आहे. आकिबच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच रणजी करंडक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.
आयपीएलमध्ये कोट्यवधींची बोली
आकिब नबीच्या या कामगिरीची दखल 'आयपीएल'मध्येही घेतली गेली. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ८ कोटी ४० लाख रुपयांना खरेदी केले असून, तो यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. निवड समितीचे लक्ष त्याच्यावर असून, अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात त्याला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
याच सोहळ्यात शुभमन गिलला 'क्रिकेटर ऑफ द इयर', राहुल द्रविडला 'सी.के. नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट' आणि मिताली राजला महिला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच मुंबईच्या युवा आयुष म्हात्रेला 'लाला अमरनाथ पुरस्कार' दिला जाईल. बीसीसीआयचा हा सोहळा रविवारी दिल्ली येथे पार पडणार असून, यामध्ये टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघांचाही विशेष गौरव केला जाणार आहे.