Join us  

३३२ खेळाडूंवर लागणार बोली; १९ डिसेंबर रोजी होणार लिलाव प्रक्रिया

आता ३३२ खेळाडूंच्या नावाला मंजुरी देण्यात आली असून त्यात टीम इंडियाकडून खेळलेले १९ खेळाडू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 3:04 AM

Open in App

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) २०२० च्या हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार असून या लिलावासाठी एकूण ९७१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून ३३२ खेळाडूंची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन यांनादेखील स्थान देण्यात आले.

३३२ खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आली आहे. सुरुवातीला आलेल्या ९७१ खेळाडूंच्या यादीत ७१३ भारतीय आणि २५८ परदेशी खेळाडू होते. त्यानंतर आता ३३२ खेळाडूंच्या नावाला मंजुरी देण्यात आली असून त्यात टीम इंडियाकडून खेळलेले १९ खेळाडू आहेत. याशिवाय मूळ यादीत नसलेला विंडीजचा केसरिक विलियम्स, बांगलादेशचा मुशिफिकूर रहीम, ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झम्पा, इंग्लंडचा २१ वर्षीय विल जॅक्स यांसारख्या २४ नवोदित खेळाडूंची नावेदेखील आहेत.

लिलाव प्रक्रिया केवळ एक दिवस रंगेल. या प्रक्रियेदरम्यान आठ फ्रेंचाईजींंना पूर्ण संघ निवडण्यासाठी एकूण ७३ खेळाडू हवे आहेत. त्यापैकी २९ खेळाडू परदेशी असतील. अंतिम यादीत भारताचा रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट यासारख्या खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलही या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. मानसिक तणावामुळे तो क्रिकेटपासून काही काळ दूर होता. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, मिचेल मार्श, आफ्रिकेचा डेल स्टेन, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांनाही अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. 

नवख्या खेळाडूंवरही नजर

सर्वाधिक दोन कोटी मूळ किंमत असलेल्या यादीत सात खेळाडू, दीड कोटी किंमत असलेल्या यादीत दहा आणि एक कोटी मूळ किंमत असलेल्या यादीत २३ खेळाडूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत १८३ नावे असून त्यांच्यावर २० लाख, ७ खेळाडूंवर ४० लाख आणि आठ खेळाडूंवर ३० लाख अशी किंमत ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएलग्लेन मॅक्सवेलआॅस्ट्रेलिया