Asian Games 2023, PAK vs BAN : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये पाकिस्तानला क्रिकेटचे कांस्यपदकही जिंकता आले नाही. उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून हार खाल्याने त्यांचे भारताविरुद्ध फायनल खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. किमान बांगलादेशला नमवून कांस्यपदक तरी जिंकणे त्यांना नाही जमले. बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाने कांस्यपदकाच्या लढतीत पाकिस्तानला ९ बाद ६४ धावांवर रोखले अन् नंतर १८.२ षटकांत लक्ष्य पार केले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला २० षटकांत ९ बाद ६४ धावाच करता आल्या. आलिया रियाझ ही १७ धावांसह सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. सदाफ शमासने १३, कर्णधार निदा दारने १४ व नतालिया परवेझने ११ धावा केल्या. बांगलादेशच्या शोर्ना अक्तेरने १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. तिला संजिदा अक्तेर मेघला ( २-११), मरुफा अक्तेर ( १-२), नहिदा ( १-१५) व राबेया खान ( १-१४) यांची चांगली साथ मिळाली.
प्रत्युत्तरात बांगलादेशला शमिमा तुल्ताना ( १३) व साथी राणी ( १३) यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर त्यांचाही डाव गडगडला. नर्शा संधूने ४-१-१०-३ अशी स्पेल टाकून पाकिस्तानला आशा दाखवली. मात्र अन्य गोलंदाजांमुळे पाकिस्तानला अपयश आले. बांगलादेशने ५ विकेट्स राखून मॅच व कांस्यपदक जिंकले. शोर्ना अक्तेरने नाबाद १४ धावा केल्या आणि १८.२ षटकांत ५ बाद ६५ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.