Asia Cup Trophy Moved From ACC Headquarters To A Hidden Place In Abu Dhabi : दुबईच्या मैदानात रंगलेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला चारीमुंड्याचित केलं. एकही सामना न गमावता स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय संघावर ट्रॉफी आणि मेडलशिवाय मायदेशी परतण्याची वेळ आली. भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारण्यास साफ नकार दिला होता. हक्काची ट्रॉफी मिळवण्यासाठी बीसीसीआयने फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगत असताना ट्रॉफीसंदर्भात एक नवी माहिती समोर येत आहे. पाकनं ट्रॉफी पळवापळवीच्या खेळानंतर आता लपवा लपवीचा खेळ सुरु केल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ACC मुख्यालयातून आशिया कप ट्रॉफी गायब? नक्वींनी ट्रॉफी अबुधाबीत लपवल्याचा दावा
एएनआयनं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ ज्या ट्रॉफीचा विजेता आहे, ती ट्रॉफी आता एसीसी कार्यालयात नाही. एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसीन नक्वी यांनी ही ट्रॉफी अबुधाबीतील गुप्त ठिकाणी नेऊन ठेवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्याने नुकतीच एसीसी कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी या गोष्टीचा खुलासा झाल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
कर्णधार आणि खेळाडूसह या आणि माझ्याकडून ट्रॉफी घेऊन जा
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने मोहसीन नक्वी यांना अधिकृतपणे पत्र लिहून, विजेत्या भारतीय संघाकडे सुपूर्द करावी, अशी मागणी केली होती. जर लवकरात लवकर यावर निर्णय घेतला नाही तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) घेऊन जाऊ, असे बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्टपणे सांगितले होते. तुमचा कर्णधार आणि खेळाडूंसह या आणि माझ्याकडून ट्रॉफी घेऊन जा, अशी भूमिका नक्वी यांनी मांडली आहे. ट्रॉफी देणार, पण ती माझ्याकडून घ्यावी लागणार यावर ते ठाम आहेत. भारतीय संघाला ट्रॉफी देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेनं १० नोव्हेंबरला दुबईत खास कार्यक्रम आयोजित केल्याचेही नक्वींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पण ट्रॉफी मीच देणार या भूमिकेमुळे या मुद्यावर तोडगा निघणे मुश्किल दिसते. त्यात आता ट्रॉफी कुठं आहे? आणि भारतीय संघाकडे ती केव्हा सुपूर्द होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.