आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यातील ट्रॉफीवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आशियाई क्रिकेट परिषद यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानला हरवून विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाला ट्रॉफी न दिल्याच्या निषेधार्थ बीसीसीआयने आता थेट एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी करणारा अधिकृत ईमेल पाठवला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, "आम्ही नक्वी यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत. आम्ही टप्प्याटप्प्याने या प्रक्रियेत पुढे जात आहोत. मोहसिन नक्वी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही हे प्रकरण अधिकृत ईमेलद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे नेऊ आणि पाठपुरावा करत राहू."
नेमका वाद काय?
आशिया कपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर सादरीकरण समारंभात भारतीय खेळाडूंनी एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून पदके आणि ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यानंतर नक्वी यांनी एसीसी अधिकाऱ्यांना ट्रॉफी घेऊन दुबईतील एसीसी कार्यालयात घेऊन जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे, सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईतील एसीसी कार्यालयात आहे.
मोहसिन नक्वी यांच्या वर्तनावर आक्षेप
बीसीसीआयने ३० सप्टेंबर रोजी झालेल्या एसीसीच्या बैठकीत मोहसिन नक्वी यांच्या वर्तनाचा निषेध केला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यावर जोर दिला की, आशिया कप २०२५ ची ट्रॉफी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील विजयी भारतीय संघाला तातडीने अधिकृतपणे देण्यात यावी. बीसीसीआयच्या मते, आशिया कप ही एसीसीची मालमत्ता आहे आणि विजयी संघाला ती त्वरित दिली पाहिजे.