Join us  

आशिया चषक : भारताकडे अफगाणिस्तानविरुद्ध मधल्या फळीच्या प्रयोगाची संधी

भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप सुपर फोरच्या अंतिम सामन्यात मंगळवारी अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 4:37 AM

Open in App

दुबई : भारतीय क्रिकेट संघाला आशिया कप सुपर फोरच्या अंतिम सामन्यात मंगळवारी अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय संघ स्पर्धेत फलंदाजीची विशेष संधी न मिळालेल्या मधल्या फळीतील फलंदाजांना खेळपट्टीवर वेळ घालविण्याची संधी देण्यास प्रयत्नशील राहील.भारताने अंतिम फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केले असून विजय मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील राहील. अंतिम लढतीपूर्वी भारतीय संघ संघातील सर्वच विभाग पूर्णपणे सज्ज करण्यासाठी प्रयत्नशील राहील. हाँगकाँगविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता भारताने पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यात आणि बांगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला आहे.कर्णधार रोहित शर्माही मधल्या फळीतील फलंदाजांना राशिद खानसारख्या गोलंदाजाविरुद्ध खेळपट्टीवर पुरेसा वेळ घालविण्याची संधी देण्यास प्रयत्नशील आहे.शिखर धवन (३२७) आणि रोहित शर्मा (२६९) यांनी चार सामन्यांत भारतातर्फे सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. अन्य फलंदाजांना विशेष योगदान देण्याची संधी मिळालेलील नाही. या दोघांव्यतिरिक्त अंबाती रायडूने ११६ धावा फटकावल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव व दिनेश कार्तिक यांच्यासारख्या फलंदाजांना आतापर्यंत खेळपट्टीवर छाप सोडण्याची पुरेशी संधी मिळालेली नाही, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. रोहित व धवन यांनी अनुक्रमे २८४ व ३२१ चेंडू खेळलेले आहेत तर रायडू १६२ चेंडूंना सामोरा गेलेला आहे. कार्तिकने ७८, धोनीने ४० आणि केदार जाधवने २७ चेंडू खेळलेले आहेत. आघाडीची फळी अपयशी ठरली तर या तिघांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागेल.रोहितने बांगलादेशविरुद्ध धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळविले. माजी कर्णधाराने ३३ धावा फटकावल्या, पण त्यावेळी संघावर दडपण नव्हते. जर राशिद खान आणि मुजीब-उर-रहमान दडपण निर्माण करण्यात यशस्वी ठरले तर अंतिम लढतीपूर्वी मधल्या फळीला चांगला सराव मिळू शकतो.भारतीय कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे संघाला पूर्ण ५० षटके खेळण्याची संधी मिळेल. कारण भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत प्रतिस्पर्धी फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. सर्व गोलंदाजांची सरासरी पाचपेक्षा कमी धावाची आहे. फिरकीपटूंना शानदार भूमिका बजावली आहे. युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांनी अचूक मारा केला तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने डेथ ओव्हर्समध्ये आपल्या अचूक यॉर्करच्या जोरावर चांगला मारा केला आहे. भुवनेश्वर कुमारनेही गोलंदाजीत सातत्य राखले आहे. (वृत्तसंस्था)भारत अंतिम लढतीपूर्वी बुमराह व भुवनेश्वर यांना या लढतीत विश्रांती देऊ शकतो. अशा स्थितीत दीपक चाहर, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांच्यापैकी दोघांना अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळू शकते.अफगाणिस्तानचा विचार करता भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवत आपल्या मोहिमेचा गोड शेवट करण्यास प्रयत्नशील राहील. त्यांनी या स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नेहमी आव्हान दिले, पण अनुभवाचा अभाव त्यांच्यासाठी आडकाठी ठरला.साखळी फेरीत श्रीलंका व बांगलादेशला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान सुपर फोर सामन्यात पाकिस्तान व बांगलादेश या संघाविरुद्ध थोड्या फरकाने पराभूत झाला. बांगलादेशविरुद्ध त्यांना अखेरच्या षटकात ८ धावा आवश्यक होत्या, पण त्यांच्या फलंदाजांकडे मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीचे उत्तर नव्हते.भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन,अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, दीपक चाहर, सिद्धार्थ कौल, मनीष पांडे.अफगाणिस्तान : मोहम्मद शहजाद, इहसानुल्लाह जमात, जावेद अहमदी, रहमत शाह, असगर अफगान, हस्मत शाहिदी, मोहम्मद नबी, गुलबदीन नाइब, राशिद खान, नजीबुल्लाह जादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, समीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद अहमद शेरजाद, अशरफ , मोमांद वफादार.

टॅग्स :आशिया चषकभारतीय क्रिकेट संघ