लाहोर: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताकडून सलग तिसऱ्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. केवळ सोशल मीडियावरच नव्हे, तर राजकीय नेते आणि माजी क्रिकेटपटूंनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून, त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे वरिष्ठ नेते मुनीस इलाही यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर नक्वींवर थेट निशाणा साधला. "या निवडक पंतप्रधानांमध्ये थोडी जरी नैतिकता असेल, तर त्यांनी मोहसिन नक्वींच्या विरोधात कारवाई करावी. नक्वी यांनी कमी वेळात पाकिस्तान क्रिकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे," असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, ज्यांनी नक्वींची निवड केली आहे, त्यांना देखील तातडीने पदावरून हटवावे, अशीही मागणी केली आहे.
माजी सिंध राज्यपाल मोहम्मद झुबेर यांनीही नक्वींच्या निर्णयांवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, "या व्यक्तीने पाकिस्तानचे सर्वोत्तम फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना वगळून संघाची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे." झुबेर यांच्या मते, नक्वी यांनी वैयक्तिक आकसापोटी संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला, ज्यामुळे पाकिस्तानचा सलग तीन सामन्यांमध्ये भारताकडून पराभव झाला.
या सर्व टीकेमध्ये, तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही एक मोठी टिप्पणी केली आहे. "मोहसिन नक्वी क्रिकेटसोबत जे करत आहेत, तेच लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर पाकिस्तान देशासोबत करत आहेत," असे सांगत त्यांनी नक्वींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
पत्रकार उमर दराझ गोंदल यांनीही या वादात उडी घेतली आहे. नक्वी हे 'बिग बॉस' च्या सांगण्यावरून पीसीबीचे अध्यक्ष झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत असे राजकीय नियुक्त झालेले लोक बोर्डाचे प्रमुख असतील, तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेटची प्रगती होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या सलग पराभवामुळे आणि वादग्रस्त निर्णयामुळे मोहसिन नक्वी सध्या राजकीय आणि क्रीडा वर्तुळात टीकेचे लक्ष्य बनले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाची खुर्ची आता धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.