PAK vs SL Asia Cup 2025: पाकिस्तान क्रिकेट संघाची आशिया कप २०२५ स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी संमिश्र स्वरूपाची झाली आहे. भारतीय संघाकडून दोन्ही सामन्यात त्यांना अतिशय मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. पण युएई आणि ओमानच्या संघांविरूद्ध पाकिस्तानने सहज विजय मिळवला आहेत. अशातच आज सुपर-४ च्या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी सुपर-४ मधील पहिला सामना हरला आहे. श्रीलंकेने बांगलादेशविरूद्धचा सामना गमावला आहे तर पाकिस्तानला भारतासमोर हार मानावी लागली आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो'चा असणार आहे. अशातच गेल्या २१८० दिवसांचा इतिहास पाहता, पाकिस्तानच्या संघाचा आजच्या सामन्यातील पराभव निश्चित आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा आकडा चर्चेत आला आहे. गेल्या तब्बल २१८० दिवसांपासून पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. या कालावधीत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला तगडं आव्हान दिलं असून पाकिस्तानसाठी ही आकडेवारी चिंताजनक मानली जात आहे. आज होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर ‘करो या मरो’ अशी परिस्थिती आहे. पराभव झाल्यास त्यांना स्पर्धेबाहेर जावे लागू शकते. त्यामुळे पाकिस्तानच्या संघावर प्रचंड दबाव आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, कारण गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रतिस्पर्धी पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले आहे.
पाकिस्तानच्या संघातील फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही फारशी चांगली झालेली नाही. तशातच पाकिस्तानकडे बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शादाब खान यांसारखे धडाडीचे खेळाडू नाहीत. त्यामुळे अलीकडील फॉर्म आणि मानसिक दबाव यामुळे पाकिस्तानच्या संघाच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तुलनने श्रीलंकेकडे प्रतिभावान गोलंदाज आणि फलंदाज आहेत. त्यामुळे आजचा सामना फक्त गुणतालिकेसाठी नाही, तर पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.