आशिया चषक २०२५ स्पर्धेत टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियाने ग्रुप-अ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात यूएई संघाचा ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत यूएईच्या संघाला फक्त ५७ धावांत गुंडाळले. दरम्यान, टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिषेकच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला.
यूएईने दिलेल्या ५८ धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिलसह अभिषेक शर्मा सलामीला आला. अभिषेकने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने षटकार मारला. या कामगिरीसह तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला. याआधी रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी ही कामगिरी केली आहे. या सामन्यात अभिषेकने केवळ १६ चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारे भारतीय
नाव | विरुद्ध संघ | ठिकाण | वर्ष |
रोहित शर्मा | इंग्लंड | अहमदाबाद | २०२१ |
यशस्वी जैस्वाल | झिम्बाब्वे | हरारे | २०२४ |
संजू सॅमसन | इंग्लंड | मुंबई | २०२५ |
अभिषेक शर्मा | यूएई | दुबई | २०२५ |
टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानीआतापर्यंत १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अभिषेक शर्माने त्याच्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. त्याने आतापर्यंत दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली असून, त्याचा स्ट्राईक रेट १९३.५० आहे. याच उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अभिषेक शर्मा सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.