संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेत खेळलेल्या सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने फायनल गाठली आहे, आता अंतिम सामन्यात भारताची गाठ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ दोन वेळा आमनेसामने आले असून, दोन्ही वेळा भारताने बाजी मारली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. मात्र या आंतिम लढतीपूर्वी टीम इंडियाच्या गोटातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा केवळ एक षटक टाकल्यानंतर मैदानातून गायब झाला होता. तसेच लढत अटीतटीची झाली असताना त्याची अनुपस्थितीत चिंतेचा विषय ठरली होती.
दरम्यान, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यादव याने हार्दिक पांड्याचं नाव न घेता त्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. आज रात्री चांगल्या प्रकारे रिकव्हरी होईल. अंतिम सामन्याबाबत आतापासून विचार करता कामा नये. आजा काही खेळाडूंना अधिकच आखडल्यासारखे झाले. यातून सावरण्यासाठी उद्याचा दिवस आहे. तसेच आम्ही अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करून.
सूर्यकुमार यादवने दिलेल्या माहितीनंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्कल यांनी अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याचे स्पष्ट केले. हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा दोघेही दुखापतग्रस्त आहेत. अभिषेक दुखापतीतून सावरला आहे. मात्र हार्दिक पांड्याच्या फिटनेसची तपासणी आम्ही आज रात्री आणि उद्या सकाळी करू. त्यानंतरच त्याच्याबाबत कुठलाही निर्णय घेतला जाईल, असे मॉर्कल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली झाली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या १७ सामन्यांमध्ये ३५ च्या सरासरीने ३१५ धावा काढल्या आहेत. तर २५ बळीसुद्धा टिपले आहेत. मात्र आता पांड्याला दुखापत झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.