पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ,सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय क्रिकेट संघाने ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, या लढतीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते. एवढंच नाही तर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्याचा निषेध करत हा विजय या हल्ल्यातील मृतांना समर्पित केला होता. दरम्यान, पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन टाळल्यामुळे भारतीय संघ आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यात नाणेफेक झाल्यावर सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन करणं टाळलं. त्यानंतर सामना संपल्यावरही भारतीय संघाने पाकिस्तानी संघासोबत कुठलीही खेळभावना न दाखवता हस्तांदोलन केले नाही. मात्र भारतीय संघाने केलेल्या या कृतीमुळे पाकिस्तानी संघाचा तीळपापड झाला असून, पाकिस्तानच्या संघव्यवस्थापनाने याबाबत आपला विरोध सामनाधिकाऱ्यांकडे नोंदवला आहे. त्यामुळे आता याबाबत सामनाधिकारी आणि आयसीसी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सामन्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले की, पाकिस्तानी संघ हस्तांदोलन करण्यासाठी वाट पाहत होता. मात्र भारतीय संघाने त्यांना टाळलं आहे हे त्यांना नंतर समजलं. त्यामुळे नंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा हा सामन्यानंतरच्या कार्यक्रमात सहभागी झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
क्रिकेटच्या नियमावलीमध्ये सामना संपल्यावर हस्तांदोलन केलं पाहिजे असा कुठलाही नियम लिहिलेला नाही आहे. हस्तांदोलन हे केवळ खिलाडूवृत्तीचा मानलं जातं. त्यामुळे खेळाडू खिलाडूवृत्ती म्हणून हस्तांदोलन करतात. त्यामुळे हस्तांदोलन करण्यासाठी काही नियमच नसल्याने संघावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मात्र जाणीवपूर्वक विरोधी संघाशी हस्तांदोलन टाळलं तर ही बाब खेळभावनेच्या विरोधात मानली जाते.