सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ साखळी आणि सुपर ४ फेरी असे दोन वेळा आमने सामने आले असून, या दोन्ही लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर सहजपणे मात केली होती. मात्र या दोन पराभवांनंतरही पाकिस्तानच्या संघाचा तोरा कायम असून, आता अंतिम सामन्यात गाठ पडल्यास त्या लढतीत भारताला बघून घेऊ असा इशारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने दिला आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवल्याने स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील समीकरण रंगतदार झालं आहे. तसेच आता अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवने भारत आणि पाकिस्तानमधील लढतींबाबत केलेल्या विधानावरून शाहीनशाह आफ्रिदी याने भारतीय संघाला आव्हान दिले आहे. ‘’भारत-पाकिस्तान यांच्यातील लढतींमध्ये आता भारताचाच दबदबा राहिलेला आहे. त्यामुळे या लढतीत आता म्हणावी तशी प्रतिस्पर्धीता राहिलेली नाही’’, असे सूर्यकुमार यादवने म्हटले होते.
दरम्यान, गुरुवारी बांगलादेशविरुद्ध होणारी लढत पाकिस्तानसाठी निर्णायक ठरणार आहे. या लढतीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाहीन शाह आफ्रिदीला सूर्यकुमार यादवने केलेल्या वक्तव्यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्या प्रश्नाला बगल देत शाहीनशाह आफ्रिदी म्हणाला की, हा त्यांचा विचार आहे. त्यांना बोलू द्या. जेव्हा पुढच्या लढतीत आम्ही परत आमने सामने येऊ तेव्हा बघून घेऊ. आम्ही इथे आशिया चषक जिंकायला आलो आहोत. तसेच त्यासाठी आम्ही पूर्ण मेहनत करणार आहोत. जर अंतिम फेरीत गाठ पडली तर पाहून घेऊ, असा इशाराही त्याने दिला.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारतामधून तीव्र विरोध होत आहे. मात्र या विरोधाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून मात घेतली होती. तर सुपर ४ फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला होता.