सध्या यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ दोन वेळा आमने सामने आले आहेत. तसेच या दोन्ही लढतीत भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं. त्यावरून आता काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी भारतीय संघाला सल्ला दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध असलेल्या आपल्या तीव्र भावना समजू शकतो. मात्र खिलाडूवृत्ती ही राजकारण आणि लष्करी संघर्षापासून वेगळी ठेवली पाहिजे, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.
शशी थरूर म्हणाले की, माझं वैयक्तिक मत विचाराल तर जर पाकिस्तानविरोधात आपल्याला एवढाच राग असेल तर आपण पाकिस्तानविरुद्ध खेळता कामा नये होतं. मात्र जर आपण पाकिस्तानविरुद्ध खेळतच आहोत तर खिलाडूवृत्ती आणि खेळभावनेने खेळलं पाहिजे होतं. तसेच पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं पाहिजे होतं.
१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना आपण असं केलं होतं. त्यावेळी सीमेवर आपले सैनिक प्राण गमावत असताना दुसरीकडे आम्ही इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आपण पाकिस्तानसोबत झालेल्या लढतीवेळी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं होतं. कारण खेळ भावना ही वेगळी असते आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाशी त्याचा संबंध नसतो, असं माझं मत आहे, असे शशी थरूर यांनी सांगितले.